
धरणगाव (प्रतिनिधी) नगरपालिकेची गत निवडणूकीत तसेच विधानसभेला माळी समाजाने शिवसेनेला भरभरून मतदान केले होते. त्यामुळे होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत माजी नगराध्यक्षा उषाताई वाघ किंवा शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र महाजन यांना उमेदवारी मिळाली असती तर अधिक आनंद झाला असता, असे मत शिवसेना युवाजिल्हाप्रमुख योगेश वाघ यांनी व्यक्त केले आहे. अर्थात ही पक्षांतर्गत बाब असून आम्ही एकदिलाने शिवसेनेचा उमेदवार निवडून आणू,असेही श्री. वाघ यांनी स्पष्ट केले आहे.
गतपालिकेच्या निवडणुकीत माळी समाज बहुसंख्य असलेल्या परिसरातून शिवसेनेच्या उमेदवारास निर्णायक आघाडी मिळाली होती. अगदी विधानसभेला देखील माळी समाजाने शिवसेनेला भरघोस मतदान केले. त्यामुळे धरणगाव शहरातून शिवसेनेला आघाडी मिळाली होती. एकंदरीत यावेळी शिवसेना माळी समाजाचा उमेदवार देईल, अशी अपेक्षा होती. त्यानुसार माजी नगराध्यक्षा उषाताई वाघ किंवा शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र महाजन यांना उमेदवारी मिळेल अशी आशा होती. अर्थात ही पक्षांतर्गत बाब आहे. त्यामुळे यावर अधिक भाष्य करणे योग्य नाही. परंतू माळी समाजाला यावेळी उमेदवारी मिळाली असती तर अधिक आनंद झाला असता. अर्थात याचा अर्थ अन्य उमेदवार दिल्यामुळे मी नाराज आहे, असा होत नाही. आताही आनंदच आहे. फक्त उषाताई वाघ किंवा राजेंद्र महाजन यांना उमेदवारी मिळाली असती, तर हाच आनंद द्विगुणीत झाला असता. यावेळी देखील धरणगावची जनता पुन्हा एकदा शिवसेनेवर विश्वास दाखवेल आणि निलेश चौधरी यांना प्रचंड बहुमताने विजयी करेल,याची खात्री आहे. तर जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांना महामंडळ किंवा विधानपरिषदेवर घेऊन पक्षाने माळी समाजाला पर्यायी गुलाबराव वाघ यांच्या पक्षनिष्ठेचा सन्मान करावा, अशीही अपेक्षा असल्याचे योगेश वाघ यांनी म्हटले आहे.