मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आगामी लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्या आहे. प्रत्येक राजकीय पक्ष निवडणूकीसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा करत आहे. त्यातच आता उमेदवारी अर्ज, जागावाटप यासर्व चर्चा प्रत्येक पक्षापक्षांमध्ये सुरू आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोडी झाली. महाविकास आघाडीत बिघाडी झाली, परंतू ही बिघाडी राज्याबाहेर झाली आहे. महाविकास आघाडीत असणारे दोन प्रमुख पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशात एकमेकांसमोर आले आहेत.
लक्षद्वीपमध्ये काँग्रेसने अब्दुल हमीद यांना उमेदवारी दिली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सध्याचे खासदार मोहम्मद फैजल यांना उमेदवारी दिली आहे. परंतू भाजपने लक्षद्वीपची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सोडली आहे. अजित पवार गटाकडून युसुफ टीपी यांना उमेदवार जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे लक्षद्वीपच्या एकमेव मतदारसंघात आता तिहेरी लढत होणार आहे. आता राज्यात एकत्रित लढणारे काँग्रेस आणि शरद पवार गट यांचे उमेदवार लक्षद्वीपमध्ये आमने-सामने येणार आहेत, त्याव्यतिरिक्त लक्षद्वीप लोकसभा मतदारसंघात भाजपने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे ही निवडणूक रोचक होणार आहे.