पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विद्यार्थ्यांवर परीक्षेचा ताण राहू नये, अभ्यासातील घोकंपट्टी थांबावी, यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा पाठ्यक्रम तयार केला आहे. तो आराखडा तथा मसुदा नागरिकांसाठी ऑनलाइन उपलब्ध करून त्यावर ३ जूनपर्यंत हरकती मागविल्या होत्या. आता तो आराखडा अंतिम करण्यात आला असून त्यात परीक्षेत क्षमताधिष्ठित प्रश्नांवर सर्वाधिक भर दिला आहे. सुरवातीला नववी ते अकरावीसाठी आणि त्यानंतर दहावी-बारावीसाठीही तो लागू होईल.
विद्यार्थ्यांना बदलत्या जगाची आव्हाने पेलण्यासाठी मानवी मूल्ये, जीवन कौशल्ये व नैतिकतेवर आधारित तार्किक विचार करणारे शिक्षण दिले जाणार आहे. तिसरी ते बारावीपर्यंतच्या परीक्षा दोन सत्रात होतील. नवीन आराखड्यात आरोग्य, कला व व्यावसायिक शिक्षणावर भर देण्यात आला आहे. पुस्तकी ज्ञानापेक्षा आता कृतीतून ज्ञाननिर्मिती व ज्ञानवृद्धी हा त्यामागील हेतू आहे.
इयत्ता तिसरीपासून व्यावसायिक शिक्षण, तिसरी ते आठवीसाठी व्यावसायिक कौशल्ये आणि नववीपासून विशेष व्यावसायिक शिक्षणाची सोय असणार आहे. व्यावसायिक शिक्षणांतर्गत कृत्रिम बुद्धीमत्ता, मशिन लर्निंग, डाटा सायन्स, कृषी असे नावीन्यपूर्ण विषय असतील. आगामी शैक्षणिक वर्षापासून तो आराखडा दहावी-बारावी सोडून इतर वर्गांसाठी लागू होईल. त्यानंतर नवीन आराखड्यानुसार दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षेचा पॅटर्न बदलेल. दहावी-बारावीची परीक्षा काही दिवस अलीकडे घेण्याचे नियोजित असून त्यावरील हरकती, सूचना पाहून बोर्डाकडून काही दिवसात अंतिम वेळापत्रक जाहीर केले जाईल.
आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार दहावी- बारावीच्या बोर्ड परीक्षेत क्षमताधिष्ठित प्रश्न सर्वाधिक असतील. एखादा विषय विद्यार्थ्यांना किती समजला, प्रत्यक्ष जीवनात तो त्या शिक्षणाचा वापर करतोय का, ही क्षमता पडताळली जाणार आहे. २०२५-२६ नंतर परीक्षा पद्धतीत हा बदल अपेक्षित आहे.