Home राजकीय …तर शिवसेनेत नवीन ‘उदय’ होणार : वडेट्टिवारांचा दावा

…तर शिवसेनेत नवीन ‘उदय’ होणार : वडेट्टिवारांचा दावा


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा| महायुतीतील एकनाथ शिंदे यांची उपयुक्तता संपली असल्याने आता या पक्षात नवीन उदय होणार असल्याचा दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ते आज पत्रकारांशी बोलत होते.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महायुती सरकारमधील अंतर्गत तणाव चव्हाट्यावर आला आहे. पालकमंत्रिपदांवरून यात भर पडली आहे. शनिवारी महायुती सरकारने सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली होती. मात्र, रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदांच्या नियुक्तींना स्थगिती देण्यात आली. रायगडच्या पालकमंत्रीपदावर शिंदे गटाने दावा केला होता, तर नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांच्या नावाला अजित पवार गटाने विरोध दर्शविला होता. या घडामोडींमुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद उफाळून आले आहेत. तर रात्री उशिरा नाशिक आणि रायगड येथील पालकमंत्री पदांना स्थगिती देण्यात आली आहे.

या अनुषंगाने आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्या मते, महायुती सरकारमध्ये आता शिंदे यांची गरज संपली असून, त्यांना बाजूला करून नवीन नेतृत्व उदयास येण्याची शक्यता आहे. त्यांनी म्हटले की, “ही सगळी परिस्थिती पाहून जनताच सरकारला स्थगिती देईल असं मला वाटायला लागलंय. बहुमत मिळालं तरी ही काय सरकार चालवायची पद्धत आहे? आपआपसातले मतभेद वाढले आहेत. केवळ सत्तेसाठी ही स्पर्धा सुरू आहे. एकनाथ शिंदेंची गरज संपली का? कदाचित एकनाथ शिंदेंना संपवून एक नवीन उदय पुढे येईल. शिवसेनेच्या बाबतीत ही सुद्धा स्थिती येईल. शिवसेनेचा तिसरा ‘उदय’ दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.”


Protected Content

Play sound