फैजपूर ता. यावल । यावल तालुक्यातील भालोद येथील दोन शेतकऱ्यांचे ६५ हजार रूपये किंमतीचे तीन बैलांची चोरी केल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, विक्रम खेमचंद परतणे (वय-४४) रा. भालोद ता. यावल हे शेतकरी असून शेती काम करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. शेतीच्या कामासाठी त्यांच्याकडे बैलजोडी आहे. २० ऑगस्ट रोजी शेतात काम करून आल्यानंतर त्यांनी त्यांची बैलजोडी भालोद गावातील गुरांच्या गोठ्यात बैलांना बांधले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी विक्रम परतणे यांच्या मालकीचे ४५ हजार रूपये किंमतीची बैलजोडी चोरून नेल्याचे शनिवारी २१ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजता उघडकीला आला. त्यांनी परिसरात शोधाशोध केली असता त्यांच्या गावातील तुषार वासुदेव जावळे यांचा देखील २० हजार रूपये किंमतीचा बैल चोरून नेल्याचे समजले. विक्रम परतणे यांनी फैजपूर पोलीसात धाव घेवून अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून फैजपूर पोलीसात दुपारी साडेबारा वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक महेश वंजारी करीत आहे.