जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गणपती नगरात वृध्द महिलेचे बंद घर फोडून घरातून ३४ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना बुधवारी २६ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी शुक्रवारी २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, विमल मंगा शिरसाठ वय ६१ रा. गणपती नगर, पिंप्राळा, जळगाव या महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. २६ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास वृध्द महिलेचे घर बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांचे घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातून २५ हजारांची रोकड व घरातील भांडे असा एकुण ३४ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना घडल्यानंतर वृध्द महिलेने रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शुक्रवारी २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील हे करीत आहे.