जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील विटनेर शिवारातील शेत गट क्रमांक ५८ मधील शेतातून लोखंडी गेट आणि लोखंडी जाळीचे १२ बंडल असा एकुण ६० हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे गुरूवार २८ मार्च रोजी सकाळी १० वाजता समोर आले आहे. याप्रकरणी शनिवारी ३० मार्च रोजी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, भरत अभिमन पाटील वय ३४ रा. खेडी खुर्द ता. जळगाव हे कॉन्ट्रॅक्टर आणि शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे जळगाव तालुक्यातील विटनेट शिवारातील शेत गट क्रमांक ५८ मध्ये काम सुरू होते. त्याठिकाणी त्यांनी २०० किलो वजनाचे लोखंडी गेट आणि लोखंडी जाळ्याचे बंडल असा एकुण ६० हजार ५०० रूपयांचा मु्देमाल १८ मार्च रोजी ठेवलेला होता. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी हा मुद्देमाल चोरून नेल्याचे गुरूवारी २८ मार्च रोजी सकाळी १० वाजता उघडकीला आला. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर भरत पाटील यांनी सर्वत्र माहिती घेतली. परंतू चोरीला गेलेला मुद्देमालासंदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर शनिवारी ३० मार्च रोजी रात्री ८ वाजता त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ स्वप्निल पाटील हे करीत आहे.