रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील निरुळ गावात चोरीची खळबळजनक घटना उघडकीस आली असून, गावाबाहेरील वाड्यातून आठ बकऱ्या अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चोरीची ही घटना ९ सप्टेंबरच्या रात्री घडली असून, एकूण ३६ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

निरुळ येथील दीपक प्रकाश शिंदे यांचा वाडा गावाच्या बाहेर पाडळे रस्त्यावर आहे. या वाड्यात त्यांच्या पाळीव बकऱ्या ठेवण्यात येत होत्या. मात्र ९ सप्टेंबर रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी संधी साधत आठ बकऱ्या चोरून नेल्या. सकाळी ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ रावेर पोलिस ठाणे गाठले. दीपक शिंदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील वंजारी करीत असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरात तपासाची चक्रे गतिमान केली आहेत. गावकरी व शेतकऱ्यांमध्ये या घटनेमुळे चिंता निर्माण झाली असून, वाड्यांमध्ये पाळीव प्राण्यांचे संरक्षण हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
या चोरीप्रकरणामुळे परिसरात असुरक्षिततेची भावना वाढली असून, पोलिसांनी लवकरात लवकर चोरट्यांना अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. या संदर्भात काही संशयितांवर लक्ष ठेवले जात असून, तपास पुढे सुरू आहे.



