जामनेर, प्रतिनिधी | शहरात सध्या चोरीचे सत्र सुरूच असून दोन व चार चाकी वाहनांची चोरी , दुकाने तसेच घरफोडीसह आता पशुधनाचीही चोरी होत असल्याने पशुधन मालकांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी केली जात आहे.
अधिक माहिती अशी की, काल (दि.१७)रोजी उत्तररात्री शहरातील सुमारे चार-पाच गुरांची चोरी झाल्याच्या वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या आहेत. शहरातील हिवरखेडा रोडवरील शंकर नगरमधील नाट्य गृहासमोरील रहिवासी व पत्रकार पंढरीनाथ नारायण पाटील यांच्या मालकीची पांढ-या रंगाची, सुमारे ३० हजार रुपये किमतीची गाय रात्री २-३० वाजेच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरापासून दोर कापून चोरट्यांनी लंपास केली आहे. तालुक्यामध्ये आधीच पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे जंगलात चारा उपलब्ध नाही. विकत चारा घेऊन जनावरांना सांभाळावे लागत आहे. त्यातच जनावरांची चोरी होत असल्याने पशुमालकांवर दुष्काळात तेरावा महिना अशी वेळ आली आहे.