जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव एमआयडीसीतील डी सेक्टरमध्ये महावितरण कंपनीच्या मालकीच्या ट्रान्सफार्मरमधून ५०० लिटरच्या आईलची चोरी केल्याची घटना ५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवारी ९ जानेवारी रोजी सायंकाळी सव्वा सात वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील एमआयडीसीतील डी सेक्टरमध्ये महावितरण कंपनीचे मालकीचे ट्रान्सफार्मर बसविण्यात आले आहे. ४ जानेवारी रोजी दुपारी १२.३० ते ५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ट्रान्सफार्मर मधून सुमारे ५०० लिटर ऑईल चोरून नेल्याचे समोर आले आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महावितरण कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. दरम्यान, यात १२ हजार ५०० रूपये किंमतीचे ऑईल चोरून नेले. त्यानंतर महावितरणचे अधिकारी हर्षल नेहते यांनी मंगळवारी ९ जानेवारी रोजी सायंकाळी सव्वा सात वाजता एमआयडीसी पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक किशोर पाटील हे करीत आहे.