जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील वडनगरी येथील शेतकऱ्याच्या फुपनगरी शिवारातील शेतातून ३५ हजार रूपये किंमतीचे शेतीसाठी लागणारे रोटाव्हेटर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे २७ मार्च रोजी उघडकीला आले. पाच दिवसानंतर ३१ मार्च रोजी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, सुदर्शन विठ्ठल सोनवणे (वय-४०) रा. वडनगरी ता. जि.जळगाव हे शेतीचे काम करतात. त्यांच्याकडे शेतीच्या कामासाठी सोनालीका कंपनीचे ३५ हजार रूपये किंमतीचे रोटाव्हेटर आहे. तालुक्यातील फुपनगरी शिवारात त्यांचे शेत असून त्यांनी २६ मार्च रोजी रोटाव्हेटर शेतात ठेवले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी रोटाव्हेटर चोरून नेले. सुरूवातील गावातील कुणी व्यक्तीने घेवून गेले असावा असा अंदाज होता. मात्र पाच दिवस होवून रोटाव्हेटर जागेवर मिळून आले नाही म्हणून ३१ मार्च रोजी सायंकाळी सुदर्शन सोनवणे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ हरीलाल पाटील करीत आहे.