धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील विवरे भवरखेडा रोडवरील शेतातून अज्ञात चोरट्यांनी बकऱ्यांसह पाण्याची मोटारीची चोरी केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, ज्ञानेश्वर प्रताप धनगर (वय-४५) रा. नेहरू नगर ता. धरणगाव जि.जळगाव यांचे तालुक्यातील विवरे भवरखेडा रोडवर शेत गट क्रमांक ७९१ मध्ये शेत आहे. त्याठिकाणी त्यांनी बकऱ्यांसाठी शेड बांधले असून काठेवाडी जातीच्या बकऱ्या पाळलेल्या आहेत.
सोमवार, दि.६ डिसेंबर रोजी ज्ञानेश्वर धनगर यांनी सायंकाळी ७ वाजता बकऱ्यांना चारापाणी देवून ते घरी गेले. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी शेडमध्ये बांधलेल्या १० शेळ्या आणि एक पाण्याची मोटार असा एकुण ६५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे मंगळवारी ७ डिसेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता उघडकीला आले.
याप्रकरणी ज्ञानेश्वर धनगर यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार योगेश जोशी करीत आहे.