Home क्राईम एमआयडीसीतील दोन कंपन्यांमधील चोरी उघड; चोरट्याला अटक !

एमआयडीसीतील दोन कंपन्यांमधील चोरी उघड; चोरट्याला अटक !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसी परिसरातील दोन कंपन्यांमधून झालेल्या साहित्य चोरीचा छडा लावण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी इमरान खान सलीम खान भिस्ती उर्फ ‘रेपट्या’ (रा. शाहू नगर) याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसीच्या व्ही १५ सेक्टरमधील दोन कंपन्यांमधून १२ जुलै रोजी तांब्याचे तार, वायरचे बंडल आणि इतर साहित्य असा एकूण ४८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेनंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तात्काळ तपासाचे आदेश दिले.

या अनुषंगाने, पोलिस उपनिरीक्षक राहुल तायडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार गणेश शिरसाळे, रामकृष्ण पाटील, पोलिस कॉन्स्टेबल राहुल रगडे, विशाल कोळी, गणेश ठाकरे, राहुल घेटे आणि नितीन ठाकूर यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान, एमआयडीसी परिसरात बसवण्यात आलेल्या ‘नेत्रम कक्षा’च्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. या फुटेजमध्ये दोन महिला गोण्यांमध्ये साहित्य भरून ते एका रिक्षात ठेवताना स्पष्टपणे दिसत होत्या.

सीसीटीव्ही फुटेजमधील या दृश्यांच्या आधारे पोलिसांनी रिक्षाचालकाचा शोध घेतला. अथक प्रयत्नांनंतर पोलिसांनी इमरान खान सलीम खान भिस्ती उर्फ ‘रेपट्या’ याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त केली आहे. या कारवाईत ‘नेत्रम कक्षा’चे पोलिस कॉन्स्टेबल पंकज खडसे आणि मुबारक देशमुख यांनी महत्त्वाचे सहकार्य केले. या यशस्वी कामगिरीमुळे एमआयडीसी परिसरातील व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.


Protected Content

Play sound