जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भादली रेल्वे फाट्याजवळ धावत्या रेल्वेतून खाली पडून ३६ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, “अकोला तालुक्यातील चिखलगाव येथील दिनेश डोंगरे हा तरुण रेल्वेने प्रवास करीत होता. आज सोमवार, २७ जून रोजी सकाळी ४ वाजेच्या सुमारास भादली ते भुसावळ स्टेशन दरम्यान, अपलाईनवरील खांबा क्रमांक ४३२/२८ दरम्यान, रेल्वेतून पडून मृत्यू झाला.
या घटनेची माहिती स्टेशनमास्टर यांनी नशिराबाद पोलिसांना देताच पोलीस कर्मचारी सुधीर विसपुते यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रेल्वेतून पडून मृत्यू झालेल्या दिनेश डोंगरे याची पोलिसांनी अंगझडत घेतली असता त्याच्या खिशात आधारकार्ड मिळून आले. त्यावरुन त्याची ओळख पटली. त्यावरुन त्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधत त्यांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर दुपारच्या सुमारास त्यांच्या कुटुंबियांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला.