अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे गुरुवारी १७ जुलै रोजी सकाळी दहा वाजता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. निंबा पांडुरंग कुंभार (वय ३८, रा. मंगरूळ) या तरुणाने राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही, त्यामुळे परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निंबा कुंभार हा आपल्या कुटुंबासह मंगरूळ येथे राहत होता. गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास त्याने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवले. ही घटना लक्षात येताच नातेवाईकांनी तात्काळ धाव घेऊन त्याला खाली उतरवले आणि अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

या घटनेमुळे मंगरूळ गावात हळहळ व्यक्त होत आहे. निंबा कुंभार याने हे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत त्याचे कुटुंबीय आणि परिसरातील नागरिक अनभिज्ञ आहेत. या संदर्भात अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल काशिनाथ पाटील हे करत आहेत.



