जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील कोळन्हावी येथील तरूणाने तापी नदीच्या पुलावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गणेश संजय सोळुंखे (वय-२३) रा. कोळन्हावी ता. यावल असे मृत तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गणेश सोळुंखे हा आईवडील यांच्यासोबत यावल तालुक्यातील कोळन्हावी येथे वास्तव्याला होता. ट्रॅक्टरचालक म्हणून कामाला होता. सोमवारी १३ फेब्रुवारी रोजी दुपारी ५ वाजेच्या सुमारास घरात कुणाला काहीही न सांगता थेट गावानजीक असलेल्या तापी नदीच्या पुलावर गेला. तिथे त्याने थेट पुलावरून तापी नदीत उडी घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. त्याने तापी नदीत उडी घेतल्याचे काटावर गुरे चारणाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने गावाकऱ्यांना ही घटना सांगितली. त्यानुसार गावातील ग्रामस्थ व तरूणांच्या मदतीने मृतदेह तापीनदीतून बाहेर काढण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. विसपुते यांनी मयत घोषीत केले. मयताच्या पश्चात आई विठाबाई, वडील संजय पांडूरंग सोळुंखे आणि मोठा भाऊ असा परिवार आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ श्यामकांत बोरसे करीत आहे.