चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । उधार-उसनवार घेतलेल्या पैशांसाठी नागरिक सातत्याने तगादा लावत असल्याने तळेगाव येथील महिलेने चक्क स्वतःच्या घरात चोरीचा बनाव करीत तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांच्या तपासात खोट्या चोरीचा प्रकार समोर आला. या घटनेप्रकरणी आता तक्रारदार मीनाबाई संतोष पडवळकर यांच्याविरोधात कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस मुख्यालयातील जनसंपर्क विभागाने शुक्रवारी १२ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता प्रसिध्दीपत्रकाने कळविले आहे.
चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव येथे मीनाबाई संतोष पडवळकर या शेती करतात. शुक्रवार ५ एप्रिल रोजी कापूस विक्रीतून आलेली दोन लाख 49 हजारांची रक्कम चोरीस गेल्याची तक्रार नोंदवली. चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधिकार्यांनी तळेगावात भेट देत पाहणी केली. शिवाय महिलेकडून माहिती जाणून घेतली. मात्र महिलेच्या बोलण्यात तफावत जाणवत असल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण व हवालदार युवराज नाईक यांनी महिलेसह साक्षीदारांची विचारपूस केल्यानंतर त्यांनी पडवळकर यांना वेळोवेळी शेती कामासाठी उसने पैसे दिले. जानेवारी २०२४ मध्ये कापूस विक्री केला मात्र त्यानंतर उधारीचे रक्कम परत केली नाही. शिवाय विविध कारणे सांगत वेळ मारून नेली.
पोलिसांनी मनिषा पडवळकर यांना विश्वासात घेत बोलते केल्यानंतर त्यांनी चोरीचा बनाव केल्याची कबुली दिली. उधारीचे पैसे परत करण्यासाठी काही दिवसांचा अवधी पाहिजे असल्यामुळे पहाटे लवकर उठून घराच्या दरवाजास लावलेले कुलूप तोडून घरात जावून तेथील सामान अस्ताव्यस्त केला ज्यामुळे चोरी झाल्याचे स्पष्ट होईल व उधारीसाठी लोक तगादा लावणार नाहीत. चोरी झाल्याचा खोटा बनाव करुन पोलीस यंत्रणेला वेठीस धरल्यामुळे मिनाबाई संतोष पडवळकर यांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसाकडून कारवाई होणार आहे.