सिंधुदुर्ग-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | घरजावई होण्यास नकार दिल्यामुळे एका महिलेने आपल्या आई-वडिलांच्या मदतीने नवऱ्याची विजेचा शॉक देऊन हत्या केल्याची खळबळजनक घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथे घडली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, वसंत उर्फ सागर प्रभागर भगे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. वसंत हा कुडाळ तालुक्यातील माणगाव तळेवाडीचा रहिवासी होता. त्याची पत्नी काही दिवसांपूर्वी त्याच्याशी वाद घालून माहेरी गेली होती. 12 ऑगस्ट रोजी नूतनने वसंतला आपल्या घरी बोलावले. तेव्हा नूतनने आपले वडील शंकर गावडे व आई पार्वती गावडे यांच्या मदतीने घराच्या भोवती विद्युतवाहक तारांचे जाळे तयार केले.
या तारांना स्पर्श झाल्यामुळे वसंतचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची अफवा पसरवली. पण मृत तरुणाचा भाऊ संगम भगे यांनी आपला भाऊ घरजावई होण्यास नकार दिल्यामुळे त्याला त्याच्या सासरच्यांनी ठार मारल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची शहानिशा करून नूतनसह तिच्या आईवडिलांना अटक केली. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.