नवी दिल्ली वृत्तसंस्था । आयपीएलमध्ये नवीन संघ जोडण्याचा विचार करण्यासाठी २०२१ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असून २०२० च्या आयपीएल स्पर्धेत तीन नवीन मैदानांची भर पडण्याची शक्यता आहे. लखनऊ, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम या तीन शहरांमध्ये आयपीएल सामने होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आयपीएल संघांनी आंतरराष्ट्रीय संघांसोबत मैत्रीपूर्ण सामने खेळावेत, असं म्हणणं मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्ससह राजस्थान रॉयल्सचंही आहे. आयपीएल संघांना परदेशात सामने खेळण्याची परवानगी मिळू शकते. याबाबत गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत चर्चा झाली होती. मात्र बीसीसीआय अधिका-यांच्या मतानुसार, ‘किंग्ज इलेव्हन पंजाबला लखनौ हे आपलं दुसरं होमग्राऊंड बनवण्याची इच्छा आहे. तर राजस्थान रॉयल्सला अहमदाबादहून गुवाहटीला शिफ्ट व्हायचं आहे. तिरुवअनंतपुरम कुणाच्या वाट्याला येईल याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.’ गुवाहाटीच्या मैदानाला हिरवा झेंडा दाखवण्याच्या अगोदर सर्व निकष लक्षात घेतले जातील आणि गव्हर्निंग कौन्सिल या निर्णयासाठी अनुकूल असल्याचीही माहिती आहे.
‘पंजाबला गेल्या मोसमापासूनच नवीन मैदानाचा शोध होता आणि त्यासाठी मागणीही केली होती. मात्र निवडणुकीमुळे त्यावर निर्णय होऊ शकला नाही. मात्र भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यानंतर मैदानाचा जो निकाल समोर आला, त्यावरुन पंजाबला लखनौचं मैदान मिळण्याची दाट शक्यता आहे.’ पंजाबने मोहालीतील होमग्राऊंडसह इंदूरच्या मैदानातही आपले काही सामने खेळले आहेत. तिरुवअनंतपुरमच्या मैदानाबाबत भाष्य करणं हे घाईचं होईल, असंही बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं. तिरुवअनंतपुरमच्या मैदानाचा फिडबॅक चांगला असून केरळच्या नागरिकांमध्येही खेळाबाबत उत्सुकता असल्याचं बीसीसीआयचं निरीक्षण आहे.