जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मानराज पार्कजवळील रिक्षा स्टॉपजवळून पायी जात असलेल्या फळविक्रेत्या महिलेल्या गळ्यातील ३० हजार रूपये किंमतीची सोन्याची पोत दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी जबरी चोरून नेल्याची घटना बुधवारी ४ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रात्री साडेआठ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, लिलाबाई रघुनाथ गोपाळ वय ४७ रा. खंडेराव नगर, जळगाव ह्या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. फळविक्री करून त्या आपला उदरनिर्वाह करतात. बुधवारी ४ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास त्या कामाच्या निमित्ताने शहरातील मानराज पार्क येथील रिक्षा स्टॉपजवळ आलेल्या होत्या. तेथून पायी जात असतांना अनोळखी दोन जण दुचाकीवर आले. त्यांनी महिलेच्या गळ्यातील ३० हजार रूपये किंमतीची सोन्याची पोती जबरी हिसकावून चोरून नेल्याची घटना घडली आहे. यावेळी त्यांनी आरडाओरड केली तोपर्यंत दुचाकीवर बसून चोरटे पसार झाले होते. याबाबत महिलेने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार रात्री साडेआठ वाजता दुचाकीवरील अनोळखी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नरेश सोनवणे हे करीत आहे.