जळगाव- प्रतिनिधी । यावल ते फैजपूर रस्त्यावरून दुचाकीने घरी जात असताना दोन जणांनी तरुणाच्या दुचाकीचा रस्ता अडवून त्यांच्या जवळील ३९ हजार ७०० रुपयांची रोकड असलेली बॅग जबरी हिसकावून चोरून नेल्याची घटना गुरूवारी २५ जुलै रोजी रात्री १० वाजता घडली होती. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींना पैजपूर पोलिसांनी यावल शहरातून अटक केली आहे, अशी माहिती पोलीस मुख्यालयातील जनसंपर्क विभागाकडून रविवारी २८ जुलै रोजी दुपारी २ वाजता दिलेल्या प्रसिद्धीपत्रकातनुसार कळविले आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, चेतन गोपाल दरेकर वय-२९,रा. भुसावळ रोड यावल हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान गुरूवारी २५ जुलै रोजी सकाळी १० वाजता त्यांच्या मालकीची गाडी क्रमांक (एमएच १९ सीएक्स ३५०) यामध्ये विक्रीसाठी असलेला माल भरून ते डिलिव्हरी करण्यासाठी यावल तालुक्यात निघाले होते. दरम्यान डिलिव्हरी केल्यानंतर रात्री १० वाजेच्या सुमारास चेतन दरेकर हे दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले असता फैजपूर ते यावल रस्त्यावर त्यांचा रस्ता दोन जणांनी आडवीला व त्यांच्या हातातील पैशांची बॅग जबरी हिसकावून चोरी करून पसार झाले. याबाबत फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या गुन्ह्याच्या तपास सुरू असताना पोलिसांनी फिर्यादी चेतन दरेकर यांच्यासोबत असलेला साहिल याला चौकशीकामी ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने पोलीसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन त्याची अधिक चौकशी केली असता त्याने हे पैसे दानिश पटेल रा. यावल यांच्याकडे दिले असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी दानिश पटेल यांच्याकडून ३९ हजार ७०० रुपयांची रोकड जप्त केली. याप्रकरणी पोलिसांनी फरदीन कबीर पटेल वय 24 रा. आयशा नगर, यावल, सोहेल रुबाब पटेल वय 23 रा. विरार नगर, यावल आणि एक अल्पवयीन मुलगा या तिघांना ताब्यात घेतले. त्यांची पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्नपूर्णा सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षण हरिदास बोचरे, पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दिन सैय्यद, विनोद गाभणे, सहाय्यक फौजदार विजय चौधरी. पोलीस कॉन्स्टेबल राहुल नावकर आणि असलम खान यांनी केली आहे.