एरंडोल प्रतिनिधी । येथून जाणार्या राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला उडविल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली.
याबाबत वृत्त असे की अनिल ज्ञानेश्वर मराठे (वय २२, रा. बोरगाव, ता. धरणगाव ) हा तरुण आपली दुचाकी क्र.एम.एच.१९ डी.आर.३९४९ ने भालगाव मार्गे एरंडोल येथे येत होता.त्याच्या दुचाकीला एरंडोल कडून येणार्या ट्रक क्र.एम.पी.२० एच.बी.६०३९ वरील चालकाने भरधाव ट्रक चालवत समोरुन जोरदार धडक दिली.या धडकेत अनिल हा ट्रकच्या पुढील चाकात आल्याने काही अंतर फरफटत गेला व त्याचा जागीच मृत्यू झाला.
अनिलच्या मागून त्याचे चुलत भाऊ किशोर मराठे व महेश मराठे हे देखल येत होते. त्यांनी तातडीने अनिल मराठे याला एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.त्यास डॉक्टरांनी मयत घोषित केले. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला किशोर मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल जितेंद्र तायडे,पंकज पाटील,विकास खैरनार व संतोष चौधरी तपास करीत आहेत. तर टक्कर मारलेला ट्रक ड्रायव्हर हा फरार झाला आहे.