जळगाव (प्रतिनिधी) शहरातील निमखेडी रोडवर काल रात्री अचानक एक वृक्ष मुख्य रस्त्यात मधोमध कोलमडून पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. सकाळपर्यंत वृक्ष रस्त्याच पडून असल्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
या संदर्भात अधिक असे की, निमखेडी रोडवरील हाय-वे दर्शन कॉलनीलगत असलेल्या बालाजी अपार्टमेंट जवळ रविवारी रात्री साधारण ८ वाजेच्या सुमारास एक भलेमोठे वृक्ष रस्त्याच्या मधोमध कोलमडून पडले. वास्तविक बघता रात्री फार जोरदार वाराही नव्हता. परंतु वृक्ष आतून पोकळ झाल्यामुळे पडले असा,अंदाज आहे. दरम्यान, रात्री चंदू अण्णा नगर, शिवधाम मंदिर, निमखेडी गावसह परिसरातील अनेक कॉलनीमधील लोकांना खोटे नगरच्या मागील गल्ल्यांमधून घरी पोहचावे लागत होते. तर आज सकाळी स्कूल बसेस, रिक्षांना देखील फिरून जावे लागल्यामुळे अनेक विद्यार्थांना शाळेत पोहचायला उशीर झाला. चंदू अण्णा नगरपुढे कचरा डेपो असल्यामुळे शहरातील भरून आणलेल्या कचऱ्याची वाहने देखील रोडावर थांबून होते. सकाळी १० वाजेनंतर वृक्ष कापण्याचे काम सुरु झाले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.