मुक्ताईनगर-पंकज कपले | जुन्या पेन्शनसाठी राज्य शासनाचे कर्मचारी आक्रमक बनलेले असतांनाच मुक्ताईनगरातील व्यापार्यांनी देखील आपल्याला निवृत्ती वेतन हवे अशी मागणी केली आहे.
राज्य शासनाचे कर्मचारी हे जुन्या पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीसाठी बेमुदत संपावर गेले आहेत. सरकारी कर्मचार्यांच्या संपामुळे लोकांना त्रास होत असून याबाबत सोशल मीडियात तीव्र प्रतिक्रिया देखील उमटत आहेत. विशेष करून सरकारी कर्मचार्यांवर अनेक जण टिका करत आहेत. असाच एक टिकेचा अनोखा सूर मुक्ताईनगरातून उमटला आहे.
मुक्ताईनगर येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नितीन उर्फ बंटी मदनलाल जैन यांनी एका पत्रकाच्या माध्यमातून व्यापार्यांना देखील पेन्शन हवे अशी मागणी केली आहे. या संदर्भात जारी केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पाश्चात्त्य देशात जे लोक टॅक्स भरतात त्यांना तेथील गव्हर्मेंट साठ वर्षानंतर पेन्शन देते आमची सुद्धा यापुढे मागणी राहणार आहे या देशात सर्वात जास्त कर व्यापारी भरतात सर्वात जास्त रोजगार व्यापारी मंडळीकडून लोकांना मिळतो म्हणून व्यापार्यांना ६० वर्षानंतर पेन्शन शासनाने सुरू करावे यासाठी आम्ही व्यापारी सुद्धा शासनाकडे मागणी करणार आहोत.
यात पुढे नमूद केले आहे की, या देशाचा कणा असलेला माझा शेतकरी राब राब राबतो आपल्यासाठी धान्य व फळे पिकवतो. त्या शेतकर्यामुळे सुद्धा व्यापार पेठ चालते शेतकर्यांना सुद्धा यापुढे ६० वर्षानंतर पेन्शन लागू झाले पाहिजे अशी सुद्धा आमची मागणी राहणार असल्याचे नितीन जैन यांनी म्हटले आहे.