राष्ट्रपती राजवटीची धमकी म्हणजे जनादेशाचा अपमान : शिवसेना

sanjay raut and mungantiwar

 

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील जनतेने महायुतीला सत्तास्थापनेसाठी जनादेश दिला असताना सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात राष्ट्रपती राजवटीचा मुद्दा उपस्थित करत धमकी दिली असून ही धमकी म्हणजे महाराष्ट्रातील जनमताचा अपमान आहे. राष्ट्रपतींच्या नावाचा वापर करणे गैर असून राष्ट्रपती तुमच्या खिशात आहेत का?, असा संतप्त सवालही सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

 

सुधीर मनगंटीवार यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची दिलेली धमकी ही लोकशाहीविरोधी तसेच घटनाबाह्य आहे. तसेच हा महाराष्ट्राचा आणि विधानसभा निवडणुकीत दिलेल्या जनादेशाचा अपमान आहे. बहुमताचा आकडा असो अगर नसो राज्यात दुसऱ्या कोणी सत्ता स्थापन करु नये या मग्रुरीचा महाराष्ट्रात पराभव झाला आहे. हेच लोक राष्ट्रपती राजवट लावण्याचे इशारे देत आहेत असे सामनात म्हटले आहे. राष्ट्रपती राजवट लावण्याची धमकी देणाऱ्यांनी आधी सरकार स्थापनेचा दावा करावा, असेही म्हणत शिवसेनेने भाजपावर टीका केली आहे. सरकार बनत नाही म्हणून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी द्यायची ही तर मोगलाई आहे. कायदा आणि घटना कुणाचे गुलाम नाहीत. राज्यात सध्या जो गोंधळ सुरू आहे त्याची ठिणगी आम्ही टाकलेली नाहीये हे जनता जाणते.

Protected Content