मुरादाबाद (वृत्तसंस्था) तिसरी चूक करण्याची हिंमत कराल तर याद राखा, तुमची खैर करणार नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाकिस्तानला इशारा दिला. अलीगड येथे एका जाहीर सभेत बोलताना मोदींनी हा इशारा दिला आहे. ज्यांच्यामध्ये दम असतो, त्यांचेच जगात ऐकले जाते. जे केवळ रडत असतात, त्यांचे कुणीच ऐकत नाही.ज्या नव्या भारताची संकल्पना आपण सर्वांनी केली आहे. तो नवा भारत दमदारही असेल आणि परिणामकारकही असेल, असेही मोदी यावेळी म्हणाले.
पूर्वी अतिरेकी यायचे आणि हल्ले करून निघून जायचे. काँग्रेस फक्त ‘आमच्यावर हल्ला झाला’ म्हणत जगासमोर गळा काढायची. आजचा नवा भारत रडत नाही, अतिरेक्यांनी उरीमध्ये हल्ला करण्याची चूक केली आणि सर्जिकल स्ट्राइकच्या माध्यमातून त्यांना त्याची किंमतही चुकवावी लागली. त्यानंतर त्यांनी पुलवामामध्ये दुसरी मोठी चूक केली आणि आम्ही एअरस्ट्राइक करून दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारले. आता त्यांनी तिसरी चूक केल्यास त्यांना मोठं नुकसान सोसावं लागेल, हे सीमेपलिकडच्यांनाही कळून चुकलं आहे, असे मोदी म्हणाले.
आज पाकिस्तान जगभर रडत फिरत आहे, पण आज जग भारताच्या बाजूने उभे आहे. पाकिस्तानला जगाने दूर लोटले आहे. त्यामुळे भारत हिंमतीने जगात वावरत आहे. तुम्हाला मान खाली घालणारं सरकार पाहिजे की दमदार भारत हवाय, असा सवालही त्यांनी यावेळी केला. यावेळी मोदी यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच ‘जयभीम’चा नारा दिला. त्यावेळी हजारो लोकांनी ‘जयभीम’ची गर्जना केली.