चक्क सातपुडा पोखरून गौण खनिजाची चोरी ?

सावदा, ता. रावेर जितेंद्र कुलकर्णी l खिरोदा ते पालच्या दरम्यान चक्क सातपुडा खोदून गौण खनिजाची दिवसाढवळ्या चोरी केली जात असल्याचे दिसून आले असून या प्रकरणी महसूल खात्याने कारवाई करण्याची मागणी परिसरातून करण्यात येत आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की पाल घाट सुरू होण्याच्या आधी अजस्त्र मशिनरींच्या साह्याने सातपुडा पर्वत पोखरला जात असल्याचे धक्कादायक वृत्त आज समोर आले आहे. यासंदर्भात सावदा येथील पत्रकारांनी महसूल खात्याकडे विचारणा केली असता त्यांना या संदर्भात कोणतीही माहिती नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे महसूल खात्याची परवानगी न घेता सातपुडा पोखरण्यात येत आहे का ? असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. या परिसरातील सर्व जमीन ही वन खात्याच्या मालकीची आहे. यामुळे येथून करण्यात आलेले उत्खनन ही अतिशय गंभीर अशी बाब मानावी लागणार आहे.

या प्रकाराची वनखाते आणि महसूल खाते यांनी गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी आता करण्यात येत आहे. तर हे उत्खनन कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे याची चौकशी देखील व्हावी अशी अपेक्षा आहे.

Protected Content