श्रीनगर (वृत्तसेवा) पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट आहे. दरम्यान, पाकिस्तान आणि दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराकडून कठोर कारवाईचे संकेत मिळत आहेत. उरी येथील हल्ल्यानंतर झालेल्या सर्जिकल स्ट्राइकप्रमाणेच यावेळीही कारवाई होण्याची शक्यता पाहून पाकिस्तानचा भीतीने थरकाप उडाला असून, पाकिस्तानने नियंत्रण रेषेजवळ असलेले दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड रिकामे करून दहशतवाद्यांना सैनिक तळांमध्ये नेल्याचे वृत्त आहे.
नियंत्रण रेषेवर अतिरेक्यांनी पाकिस्तानी लष्कराच्या बाजूलाच त्यांचे लॉन्च पॅडस उभारले होते. पुलवामा हल्ल्यानंतर दोन्ही देशात तणाव निर्माण झाल्याने सर्जिकल स्ट्राइकच्या भीतिने पाकिस्तानने ही लॉन्च पॅड्स रिकामी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, पाकिस्तानने यंदा त्यांचे विंटर पोस्ट रिकामे केलेले नाहीत. दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात भारताकडून जशास तसे प्रत्युत्तर मिळण्याच्या भीतिने हे विंटर पोस्ट रिकामे करण्यात आलेले नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीमेवर पाकिस्तानचे ५० ते ६० विंटर पोस्ट आहेत. फेब्रुवारीपर्यंत हे विंटर पोस्ट हटविले जातात. मात्र सध्या या विंटर पोस्टमध्ये पाकिस्तानी सैनिक तैनात आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर सीमेवर तणाव असला तरी दोन्ही देशांनी सीमेवर अतिरिक्त लष्कर तैनात केले नसल्याचे कळते. दरम्यान, नियंत्रण रेषेपलिकडे असलेल्या दहशतवाद्यांच्या लॉन्च पॅडवर कारवाई करण्याचा भारताची इरादा नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानच्या लष्करी तळांवर हल्ला करण्याचा पर्यायच भारतीय लष्कराकडे उरतो. मात्र अशा कारवाईमुळे तणाव अधिकच वाढू शकतो.