चाळीसगाव- जीवन चव्हाण | चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक अनेक आरोप प्रत्यारोपाने गाजल्यानंतर आता सभापती पदाच्या निवडीकडे तालुकावासियांचे लक्ष लागले आहे. यामुळे सभापती पदावर कोणाची वर्णी लागणार हे सर्वांसाठी औत्सुक्याचे असणार आहे.
चाळीसगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागेसाठी नुकतीच निवडणुक प्रक्रिया हि राबविण्यात आली. या निवडणुकीत एकूण ४२ जण हे रिंगणात उतरल्याचे बघायला मिळाले. परंतु आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील स्व. रामराव जीभाऊ स्मृती शेतकरी विकास पॅनल व माजी आमदार राजीव दादा देशमुख यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनल यांच्यातील लढत ही खरी चुरशीची ठरली.
या संस्थेच्या निवडणुकीसाठी २८ एप्रिल रोजी शहरातील राष्ट्रीय कन्या विद्यालयात सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेच्या दरम्यान मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी उमेदवारांना मतदान केंद्रात जाण्यास बंदी असताना मध्ये गेल्याच्या कारणावरून दोन्ही गटात जोरदार राडा झाल्याचा यावेळी बघायला मिळाले. मात्र पोलिसांनी मध्यस्थी करून सौम्य लाठीचार्ज केला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. व सुरळीत मतदान झाले.
याच दिवशी मतदान आटोपून झाल्यावर आमदार मंगेश चव्हाण यांनी सभा घेतली. त्यांनी आपला विजय निश्चित असून गुलाल आपलाच उधळणार आहे. एक-दोन जागा विरोधकांच्या आल्या तर आल्या बाकीच्या सर्वच जागांवर वर्चस्व असणार असल्याचे जाहीर करून टाकले. त्यानंतर दुसर्या दिवशी लागलेल्या निकालात आमदार मंगेश चव्हाण यांच्या शेतकरी विकास पॅनलने १५ जागांवर वर्चस्व प्रस्थापित केले. त्यामुळे आता बाजार समितीच्या सभापती पदावर कोण वर्णी लागणार याकडे संपूर्ण चाळीसगाव वासियांचे लक्ष लागले आहे.
या संदर्भात आम्ही आज आमदार मंगेश चव्हाण यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी लवकरच चित्र स्पष्ट होणार असल्याचे सांगितले. अर्थात, यामुळे सभापती आणि उपसभापती पदाबाबत ते नेमकी कुणाची निवड करणार ? यात काही धक्कातंत्राचा वापर असेल का ? हे प्रश्न उपस्थित झाले आहेत. अर्थात, याचा निर्णय हा आमदार मंगेश चव्हाण हेच करतील हे देखील तितकेच खरे !