रावेर । जयपूर राजस्थान येथे झालेल्या 67 वी पुरुष आणि महिला अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेत रावेर येथील खेळाडू सीआयएसएफ दलात कार्यरत असलेला भोलानाथ मधुकर चौधरी याने 61 किलो वजनी गटात 225 किलो वजन उचलून कांस्यपदक पटकाविले. भोलानाथ हा नुकताच केंद्रीय पोलीस दलात पोलीस हवालदार या पदावर खेळाडू कोट्यातून भरती झाला आहे, रावेर शहरातून पोलीस दलामध्ये जवळपास 20 वेट लिफ़्टर खेळाडू भरती झालेले असून या खेळाडूंनी अनेक पदके पटकावली आहे, परंतु राष्ट्रीय पोलीस स्पर्धेत हे पहिलेच पदक असल्याने भोलानाथचे विशेष कौतुक केले आहे.
राष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकणे खूप आव्हानात्मक होते. परंतू योग्य वेळी चांगला खेळ केल्यामुळे पदक मिळवू शकलो, असे सांगत थोडक्यात सुवर्ण पदक हुकल्याची खंत देखील वेट लिफ्टिंग प्रशिक्षक संजय महाजन यांनी व्यक्त केली. तसेच मागील 14 वर्षापासून राष्ट्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत रावेर येथील खेळाडू पदक जिंकण्यासाठी प्रयत्न करत होते व प्रत्येकवेळी पदक हुलकावणी देत होते. परंतु अखेर भोलानाथ चौधरी याने घेतलेल्या कठोर परिश्रमामुळे रावेर वासीयांची प्रतीक्षा संपली असून रावेरच्यावेट लिफ्टिंग क्षेत्रात पुन्हा एक मानाचा तुरा रोवला गेला असल्या बाबतची भावना लखन महाजन यांनी बोलताना व्यक्त केली. तसेच लवकरच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रावेरचे खेळाडू पदक मिळवतील असा विश्वास व्यक्त केला. भोलानाथ चौधरी याना गेल्या वर्षी क्रीडा विभाग महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्काराने सम्मानित केले होते.