मुंबई, वृत्तसंस्था | वर्षभर तेजीच्या लाटेने गुंतवणूकदारांना खूश करणाऱ्या शेअर निर्देशांकाने वर्षाच्या शेवटच्या सत्रात झटका दिला. मंगळवारी मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये ३०४ अंकांची घसरण झाली आणि तो ४१२५३.७४ वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ८७.४० अंकांची घसरण झाली. तो १२१६८.४५ वर बंद झाला. सर्वत्र थर्टीफर्स्टची लगबग सुरु असताना सेन्सेक्स आणि निफ्टीने जाता जाता सरत्या वर्षाचा बेरंग केला.
बाजारात आज सकाळपासून नकारात्मक वातावरण होते. बँका, टेलिकॉम, ऑटो, एनर्जी, टेक आदी क्षेत्रात गुंतवणूकदारांनी शेअर्सची विक्री करून नफा वसुली केली. ज्यात अल्ट्राटेक सिमेंट, ऍक्सिस बँक, एसबीआय, इन्फोसिस, टायटन, एचयूएल, भारती एअरटेल, इंडसइंड, हिरोमोटो कॉर्प, बजाज ऑटो, टेक महिंद्रा, टीसीएस, मारुती, नेसले, बजाज फायनान्स या शेअरमध्ये घसरण झाली. एनटीपीसी, सन फार्मा, ओएनजीसी, पॉवरग्रीड हे शेअर वधारले. याशिवाय केअर रेटिंग आणि इंडियाबुल्स रियल्टी हे शेअर तेजीसह वधारले. शेअर बाजाराच्या माहितीनुसार परदेशी गुंतवणूकदारांनी सोमवारी १३० कोटींच्या शेअरची विक्री केली. स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी २०१ कोटींची खरेदी केली.
वर्षभर सरस कामगिरी
सेन्सेक्समध्ये वर्षाच्या शेवटच्या सत्रात घसरण झाली असली तरी सेन्सेक्सने २०१९ मध्ये १४.३८ टक्के परतावा दिला आहे. २०१९ मध्ये सेन्सेक्सने ५१८५ अंकांची कमाई केली. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत १२.०२ टक्के वाढ नोंदवण्यात आली. निफ्टीत १३०५ अंकांची भर पडली.