सोलापूर (वृत्तसंस्था) पराभव समोर दिसत असल्यामुळेच शरद पवारांचा तोल सुटत चालला आहे. पवार म्हणाले होते, भाजपामध्ये गेलात आता चड्या घालून मांड्या दाखवू नका. पण, इथे तर फुल पॅन्ट आहे. तुम्हीच या चड्डीवाल्यांच्या सपोर्टवर मुख्यमंत्री झाला होता, हे विसरू नका, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस कुर्डुवाडी येथील आयोजित सभेत बोलत होते. “माढा मतदार संघात निवडणूक लढण्यासाठी पवार साहेब आले होते. पण ते गेले, मी खेळणार नाही, बारावा गडी म्हणून मॅच पाहणार आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली. ज्याला आम्ही बारावा खेळाडू म्हणूनही खेळवण्यास तयार नव्हतो, त्याला मैदानात उतरवले. आता असली कोण आणि नकली टीम कोण? हे येत्या २३ तारखेला समजेल. नकली टीमच्या भरोशावर मॅच जिंकू शकत नाही.” असेही ते म्हणाले.
याचबरोबर, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला. ते म्हणाले,’राहुल गांधी यांच्या पणजोबा, आई-वडील आणि आजी यांना सत्ता दिली मात्र गरिबी हटवू शकले नाहीत. गेल्या ५० वर्षात त्यांनी भ्रष्टाचाराची मालिका दिली आणि पंतप्रधान मोदींनी मात्र अवघ्या पाच वर्षात सामान्यांच्या जीवनात परिवर्तन करीत पारदर्शी प्रामाणिक शासन दिले, भारताला जगासमोर मजबूत देश म्हणून उभे केले आहे,’ अशा शब्दात त्यांनी मोदी यांच्या धोरणांचा गौरव केला.