जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्य कार्यकारिणी बैठकीचे आयोजन दि. १३ व १४ जानेवारी जळगावात करण्यात आले असल्याची माहिती बुधवारी दि. १० जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत देण्यात आली. यानिमित्ताने राज्य अध्यक्ष, राज्य कार्याध्यक्ष यांच्यासह महत्वाचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहतील. तसेच, दि. १२ जानेवारी रोजी समितीच्या दोन विभागांच्या अभियानाचे कार्यक्रमदेखील विविध महाविद्यालयात आयोजित करण्यात आल्याची माहिती वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प विभागाचे राज्य कार्यवाह प्रा. डी. एस. कट्यारे यांनी दिली.
महाराष्ट्र महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्य कार्यकारिणी बैठकीचे वर्षातून तीनवेळा आयोजन होत असते. त्यात मागील उपक्रमांचा व निर्णयाचा आढावा घेऊन पुढील चार महिन्यांचे नियोजन केले जाते. या बैठकीचे आयोजन यंदा खान्देश विभागात असून त्यात जळगावला होत आहे. १४ वर्षानंतर राज्य कार्यकारिणी बैठक जळगावात होत आहे. या बैठकीनिमित्त राज्य अध्यक्ष अविनाश पाटील, राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे, चारही राज्य प्रधान सचिव यांच्यासह राज्याचे सर्व पदाधिकारी, ३४ जिल्ह्यांचे जिल्हा कार्याध्यक्ष, जिल्हा प्रधान सचिव हे उपस्थित राहणार आहे.
बैठकीचे आयोजन हे अजिंठा चौकातील मंगलम हॉल येथे करण्यात आलेले असून दि. १३ रोजी सकाळी १० वाजता मान्यवरांच्या हस्ते उदघाटन होईल. तसेच, दिवसभर बैठकीनंतर संध्याकाळी समविचारी, हितचिंतक यांची संवाद बैठक आयोजित आहे. दि. १४ रोजी दुपारी ३ वाजता बैठकीचा समारोप होईल, अशी माहिती प्रा. डी. एस.कट्यारे यांनी दिली. पत्रपरिषदेला जिल्हा प्रधान सचिव विश्वजीत चौधरी, जिल्हा पदाधिकारी प्रा. दिलीप भारंबे, शिरीष चौधरी, शहर शाखेचे सचिव गुरुप्रसाद पाटील आदी उपस्थित होते.
“जोविनी” विभागाच्या अभियानाचे उदघाटन
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जोडीदाराची विवेकी निवड विभागातर्फे दरवर्षी दि. १२ जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिन ते दि. १४ फेब्रुवारी रोजी जागतिक प्रेम दिननिमित्त “जोविनी राज्यव्यापी युवा संकल्प अभियान” राबविले जात असते. यंदा या अभियानाचे उदघाटन जळगावात दि. १२ रोजी सकाळी ११ वाजता धनाजी नाना चौधरी संस्थेच्या समाजकार्य महाविद्यालयात मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे, पनवेल येथील आरती नाईक या मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती जोविनी विभागाच्या जिल्हा कार्यवाह मिनाक्षी चौधरी यांनी दिली.
महिला सहभाग विभागाच्या अभियानाचा समारोप
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महिला सहभाग विभागातर्फे दरवर्षी दि. ३ जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीपासून ते दि. १२ जानेवारी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीपर्यंत “वारसा स्त्री शक्तीचा” हे अभियान राबविले जाते. या अभियानाचा समारोप शुक्रवारी दि. १२ रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) येथे दुपारी २ वाजता घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला महिला सहभाग विभागाच्या राज्य कार्यवाह आरती नाईक या मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती महिला सहभाग विभागाच्या जिल्हा कार्यवाह सुशीला चौधरी यांनी दिली.