Home आरोग्य “वंदे मातरम्” गीत हा आपला स्वाभिमान – ना. गिरीश महाजन

“वंदे मातरम्” गीत हा आपला स्वाभिमान – ना. गिरीश महाजन


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । “जगात असा एकमेव भारत देश आहे, ज्याला आपण आईचे स्वरूप दिले आहे. ‘वंदे मातरम्’ हे गीत केवळ एक कार्यक्रम नाही, तर तो प्रत्येक भारतीयाचा स्वाभिमान आहे,” असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केले. वंदे मातरम् गीताच्या १५० वर्षपूर्तीनिमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित भव्य वंदे मातरम् रॅलीचा समारोप जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात झाला, त्यावेळी ते बोलत होते.

या रॅलीची सुरुवात शहरातील शिवतीर्थ मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आली. संपूर्ण रॅली देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेली होती. रॅलीच्या समारोप प्रसंगी व्यासपीठावर राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण, सुरेश भोळे, अमोल जावळे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, तसेच पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतमातेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले, त्यानंतर स्नेहल विसपुते यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी सामूहिकपणे “वंदे मातरम्” गीत सादर केले.

यावेळी मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, बंकीमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या वंदे मातरम् गीताने भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्फूर्ती दिली. ब्रिटिशांच्या राजवटीत असंख्य क्रांतिकारकांनी हे गीत मनोमन स्वीकारले आणि त्यातूनच स्वातंत्र्य संग्रामाची ज्योत प्रज्वलित झाली. शिरीषकुमारसारख्या बालकाने स्वातंत्र्यासाठी छातीवर गोळ्या झेलल्या. त्या सर्व बलिदानांमुळे आज आपण स्वतंत्र आहोत, म्हणून या गीताचा सन्मान राखणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “आपला देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व प्रगती करत आहे. आज भारताची अर्थव्यवस्था जगात चौथ्या क्रमांकावर आहे. फायटर जेट, बुलेट ट्रेन, वंदे भारत अशा सुपरफास्ट प्रगतीचे प्रतीक असलेल्या सुविधा देशभर उभ्या राहिल्या आहेत. २०४७ पर्यंत भारत हा विश्वगुरू म्हणून उभा राहील.”

राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनीही आपल्या भाषणात सांगितले की, “‘वंदे मातरम्’ हे गीत स्वातंत्र्याला दिशा देणारे आहे. बालपणापासून आपण हे गीत म्हणत आलो आहोत. हे गीत म्हणजे मातृभूमीप्रती आदर, सन्मान आणि राष्ट्रनिष्ठेची भावना आहे.”

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या सामूहिक “वंदे मातरम्” गीत सादरीकरणावेळी तीन हजारांहून अधिक विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते. गीत सादर होत असताना संपूर्ण परिसरात राष्ट्रचेतनेचा आविष्कार पाहायला मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपचे जळगाव (पूर्व) जिल्हाध्यक्ष डॉ. राधेशाम चौधरी यांनी केले, तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

या प्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, डीन डॉ. प्रशांत सोळंके, रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, तसेच गोदावरी फाउंडेशनचे सचिव डॉ. वर्षा पाटील, डॉ. जयवंत नागुलकर, डॉ. हर्षल बोरोले, डॉ. प्रशांत वारके, आणि शहरातील विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक, अधिकारी व नागरिक उपस्थित होते.


Protected Content

Play sound