शिवसेना सोयीप्रमाणे भूमिका बदलत नाही

jalgaon Shivsena

मुंबई (वृत्तसंस्था) माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर हल्ला चढवला होता. शिवसेनेच्या स्थापनेवेळी ‘शिवसेना’ हे नाव ठेवताना शिवाजी महाराजांच्या वंशजांना विचारले होते का? वडापावला शिवाजी महाराजांचे नाव का दिले? असे सवाल उदयनराजे यांनी केले होते. त्यावर उदयनराजे यांचे नाव न घेता शिवसेनेने दैनिक ‘सामना’तून शिवसेना सोयीप्रमाणे भूमिका बदलत नाही. सरड्याप्रमाणे रंग बदलणाऱ्यांनी व शब्द फिरवणाऱ्यांनी याचे भान ठेवले पाहिजे, अशा शब्दात प्रतीउत्तर दिले आहे.

 

शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकाच्या वादाला पूर्णविराम दिला. त्याचवेळी भाजपावर टीका करण्याची संधी साधली आहे. पुस्तकाच्या वादात छत्रपती शिवाजी महाराज जाणते राजे होते. मग शरद पवारांना जाणता राजा कसे म्हणता असं भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं होतं. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच हा प्रश्न विचारण्याचा सल्ला शिवसेनेनं मुनगंटीवार यांना दिला आहे. “सुधीर मुनगंटीवार यांनी एक बाळबोध प्रश्न विचारला आहे, ‘पवारांना जाणता राजा कसे म्हणता?’ हा प्रश्न त्यांनी श्री. नरेंद्र मोदी यांनाच विचारायला हवा. छत्रपती शिवरायांना ‘रयतेचा राजा’ असे संबोधले जात असे. जनतेच्या प्रश्नांबाबत व भावनांबाबत खडान्खडा माहिती असलेला लोकनेता म्हणजे ‘जाणता राजा’ हे पवारांच्या बाबतीत नरेंद्र मोदी यांनीच मान्य केले. त्यामुळे मुनगंटीवार यांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मोदीच देतील. पवार जाणता राजा कसे? असा प्रश्न उभा केल्याने आज के शिवाजी : नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून भडकलेल्या वादाची आग कमी होणार नाही. मधल्या काळात भाजपच्या काही नेत्यांच्या मागेही ‘जाणते राजे’ अशा उपाध्या हौसेने लावण्यात आल्या. पण कुठे शिवाजी राजे व कुठे हे सर्व हवशे नवशे गवशे!,” अशी बोचरी टीका शिवसेनेने केली आहे. ‘आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकावरून महाराष्ट्रात संतापाची लाट उठल्यावर भाजपवाल्यांना नमते घ्यावे लागले. या वादावर आता पडदा पडावा आणि वाद संपल्यावर कुणी पुन्हा जुनी मढी उकरून काढू नयेत हीच अपेक्षा आहे, असे शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून म्हटले आहे.

Protected Content