दीपनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । औष्णिक विद्यूत केंद्रातील नवीन ६६० मेगावॅट प्रकल्पात महाजेनकोच्या सुरक्षा विभागामध्ये महाजेनकोच्या अधिपत्याखाली कार्यरत भारत हेवी इलेक्ट्रिकल कंपनीच्या अखत्यारित्या कार्यरत कंत्राटदार आणि कंत्राटी असलेल्या कामगारांबाबतची कुठलीही माहिती उपलब्ध नाही. सुरक्षा विभागाकडे कोणत्याही कामगारांचे प्रकल्पातील प्रवेशपत्राकामी गरजेचे असलेले आधार कार्ड, चारित्र्य पडताळणी दाखला तसेच शारीरिक तंदुरुस्ती प्रमाणपत्र यासारखे गरजेचे व अति महत्वाचे दस्तावेजाच्या साक्षांकित प्रती उपलब्ध नसल्याचे दिसून आले आहे.
भुसावळ औष्णिक विद्यूत केंद्राच्या २१० मेगावॅट आणि २x५०० मेगावॅट प्रकल्पाच्या सुरक्षा विभागाकडून नियमांचे काटेकोरपणे पालन होत असल्याचे एकीकडे आढळून येते. सदर विभागाकडे कंत्राटी कामगारांना प्रकल्पात प्रवेश करणेकामी देण्यात येणाऱ्या प्रवेशपत्राकरिता सुरक्षा विभागाकडून कंत्राटी कामगारांचे आधार कार्ड, चारित्र्य पडताळणी दाखला तसेच शारीरिक तंदुरुस्ती प्रमाणपत्र यासारख्या दस्तावेजांच्या साक्षांकित प्रती व्यवस्थित रित्या जतन केल्याचे आढळून येते. तसेच सदर प्रकल्पांमध्ये चोऱ्यांचे प्रमाणही खूप कमी झाल्याचे निदर्शनास येते. मात्र असे औष्णिक विद्यूत केंद्रातील नवीन ६६० मेगावॅट प्रकल्पात दिसून येत नाही.
तसेच नविन प्रकल्पामध्ये दिवसेंदिवस चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे नवीन प्रकल्प उभारणीचे काम सुरू असताना सदर कामाच्या ठिकाणी कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांचे चारित्र्य पडताळणी दाखले, महाजेनको प्रशासनाकडे उपलब्ध असणे अति आवश्यक होते. परंतु नवीन प्रकल्पाच्या सुरक्षा विभागाने सदर बाब गांभीर्याने घेतलेली नाही. सदर प्रकल्पात बरेच परप्रांतीय कामगार देखील कार्यरत असून त्याबाबतची सुद्धा प्रशासनाकडे कुठलीही माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे नवीन प्रकल्पाच्या उभारणी ठिकाणी कुठलीही दहशतवादी घटना घडण्याबाबतची शंका टाळता येत नाही.
तसेच नवीन प्रकल्पात कामगारांच्या दुचाकी वाहनांच्या प्रवेशासाठी नियमावलींची ऐशी तैशी झाल्याचे लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधींना निदर्शनास आले. ६६० मेगावॅट प्रकल्पाच्या सुरक्षा विभागाकडून कामगारांच्या दुचाकी वाहनांची कुठलीही माहिती तसेच कागदपत्रे न घेता सदर कामगारांकडून ५०० वा १००० रुपये घेऊन त्या कामगारांना त्यांची दुचाकी वाहने प्रकल्पामध्ये येण्या जाण्याचा परवाना दिला जात असून फार मोठ्या आर्थिक तडजोडी सुरक्षा विभागात सुरू आहेत.
लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला विनंती आहे की, सदर प्रकल्प उभारणी ठिकाणी कार्यरत असलेल्या सर्व कामगारांच्या चारित्र्य पडताळणी दाखल्यांची तपासणी करून प्रकल्पात कार्यरत असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कामगारांवर कार्यवाही करावी आणि भविष्यात होऊ शकणाऱ्या आकस्मिक घटनेस वेळीच आळा घालावा.