चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने दि.10 नोव्हेंबर रोजी सातमाळ डोंगररांगेतील किल्ले रवळ्या जवळ्या दुर्गदर्शन मोहीम उत्साहात संपन्न झाली आहे.
शिवछत्रपतींच्या स्वराज्याचे साक्षीदार असलेल्या या रवळ्या जवळ्या किल्ल्यांचे दर्शन घेत किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तू त्यांचे अवशेष व सभोवतालचा निसर्गरम्य परिसर याचे विलोभनीय दृश्य टिपले. या किल्ल्यावर अनेक पडक्या वाड्यांचे अवशेष, पाण्याचे टाके, मुस्लिम पद्धतीचे कबर, वजा थडगे, बजरंग बलीची मूर्ती आणि याठिकाणी वर्षेभर स्वच्छ व सुंदर पाणी राहत असलेले मोती टाके त्या शेजारी पुरातन असे दगडी रांजण, रवळ्या-जवळ्या या दोन किल्ल्यांच्या मधील पठारावर असून जवळा किल्ल्यावर जाण्यासाठी कातळकड्यावर दगडी पायऱ्या आहेत. यातील काही पायऱ्या ब्रिटिशांनी सुरुंग लावून तोडल्याच्या खुण या ठिकाणी स्पष्ट पाहायला मिळते. तसेच या पायऱ्या चढून भुयारी मार्गातून एका छोट्या दरवाजातून किल्ल्याच्या शिखरावर पोहोचल्यानंतर स्वर्गीय सुख अनुभवायला मिळते. या किल्ल्यावरून आजूबाजूच्या परिसरातील किल्ले धोडप, मार्कंडया, कन्हेरगड, कोळदेहेर, इंद्रायणी, व खान्देशची कुलस्वामिनी असलेल्या आई सप्तशृंगी देवीच्या सप्तशृंगी गडाचे व देवीच्या मंदिराचे मोहक असे दर्शन होते.
किल्ल्याच्या पठारावर चार ते पाच घरांची एक आदिवासी वस्ती देखील आहे. हे आदिवासी गुराखी गडावर येणाऱ्या दुर्गप्रेमींना मोठा आपुलकीने गडावरील वाटा दाखवतात. तसेच काही प्रमाणात माहितीही देतात संपूर्ण गड पाहून उतरून आल्यानंतर गडाच्या पायथ्याला असलेल्या जांभुळपाडा तसेच कळवण तालुक्यातील पाळे या गावाचे ग्रामसेवक गांगुर्डे भाऊसाहेब यांनी सर्व सह्याद्री प्रतिष्ठान ग्रुपसाठी गरमागरम चहाची व्यवस्था केली. याचबरोबर या गावातील परिवाराने सर्व शिलेदारांना आपल्या शेतातील भुईमुगाच्या ओल्या शेंगा मुबलक प्रमाणात खायला दिल्यात पाड्या वस्तीवरील या आदिवासी लोकांची ही दिलदारी खरोखर वाखाणण्याजोगी असते हा पाहुणचार घेऊन आम्ही सर्व आपला थकवा विसरून चाळीसगावकडे परतीच्या मार्गाला लागलो. आणि किल्ले रवळ्या जवळ्या मोहिम संपन्न झाली.