Home Cities धरणगाव पाळधी ते हॉटेल सुगोकी कॉर्नर दरम्यानचा रस्त्यावर खड्डेच खड्डे!

पाळधी ते हॉटेल सुगोकी कॉर्नर दरम्यानचा रस्त्यावर खड्डेच खड्डे!


धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पाळधी ते हॉटेल सुगोकी कॉर्नर दरम्यानचा रस्ता पूर्णपणे खराब झाला असून, तो मृत्यूचा सापळा बनल्याची टीका धरणगाव काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष डॉ. व्ही. डी. पाटील यांनी बुधवारी १६ जुलै रोजी दुपारी पत्रकार परिषदेत केली आहे. विशेष म्हणजे हा रस्ता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या गावातीलच असल्याने, त्यांनी आणि खासदार स्मिता वाघ यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

डॉ. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ जुलै रोजीच त्यांनी या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत धरणगाव तहसीलदारांना निवेदन दिले होते. पाळधी रेल्वे गेट ते सुगोकी लॉन्स कॉर्नर या रस्त्यावर इतके मोठे खड्डे पडले आहेत की, येथून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. या रस्त्यावरून २० ते २५ गावांतील नागरिकांची सतत ये-जा असते, त्यामुळे हा रस्ता तातडीने दुरुस्त करणे आवश्यक आहे. मात्र, निवेदन देऊन सात दिवस उलटले तरी प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही, उलट अर्ज धुळखात पडल्याचे दिसून आले आहे.

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा रस्ता कोणाच्या अधिकारात येतो हे अधिकारीही सांगू शकत नसल्याने नागरिकांचा संताप वाढला आहे. त्यामुळे आता थेट पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि खासदार स्मिता वाघ यांनी या गंभीर प्रश्नात लक्ष घालून तातडीने रस्ता दुरुस्त करावा, अशी आग्रही मागणी डॉ. पाटील यांनी केली आहे. जर लवकरच यावर कार्यवाही झाली नाही, तर काँग्रेस कमिटी आंदोलन छेडेल असा इशाराही त्यांनी दिला.


Protected Content

Play sound