Home Cities जळगाव डेंग्यू, मलेरियाचा धोका वाढतोय: जळगाव जिल्ह्यात ‘कोरडा दिवस’ पाळण्याचे आवाहन!

डेंग्यू, मलेरियाचा धोका वाढतोय: जळगाव जिल्ह्यात ‘कोरडा दिवस’ पाळण्याचे आवाहन!


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्याची ओळख कृषी, उद्योग, शिक्षण आणि सांस्कृतिक प्रगतीने असली तरी, पावसाळ्याच्या आगमनासोबतच कधीकधी डासांमुळे पसरणाऱ्या रोगराईचा धोका निर्माण होतो. या संकटाचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, अमळनेर, चोपडा, यावल, एरंडोल, पाचोरा, भडगाव, जामनेर, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, धरणगाव, पारोळा आणि म्हसावद या पंधरा तालुक्यांतील नागरिकांनी आता ‘एक जिल्हा, एक कुटुंब’ या भावनेने एकत्र येऊन सकारात्मक पाऊले उचलण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपले आरोग्य आणि आपल्या कुटुंबाचे आरोग्य आपल्याच हाती आहे, असे जिल्हा माहिती कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

रोगराईचा धोका आणि कारणे:
पावसाळा म्हणजे निसर्गसौंदर्य असले तरी, याच काळात मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया आणि जपानी मेंदूज्वर (जे.ई.) यांसारख्या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या आजूबाजूला साठवलेल्या पाण्यात डासांची होणारी वाढ. एडीस इजिप्ती हा डास डेंग्यूचा प्रमुख वाहक असून, तो केवळ सकाळी व संध्याकाळी चावतो आणि स्वच्छ पाण्यात अंडी घालतो. अंगणातील कुंड्या, मोकळ्या डब्या, टाक्या, नारळाच्या करवंट्या, फुलदाण्या यांसारखी ठिकाणे डासांच्या उत्पत्तीसाठी धोकादायक ठरू शकतात.

प्रतिबंधात्मक उपाययोजना:

या संकटावर मात करण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी उपाय करता येतात:

पाणी साठू देऊ नका: आठवड्यातून एकदा ‘कोरडा दिवस’ पाळून सर्व पाणी साठवलेली भांडी रिकामी करून स्वच्छ करावीत.

तेलाचा वापर: साचलेल्या पाण्यात केरोसिन किंवा सरस तेलाचे २-४ थेंब टाकावेत.

गटार, नाली साफ ठेवा: गटारी व नाल्या वाहत्या ठेवून डासांच्या उत्पत्तीला आळा घाला.

फ्रिज, कूलरचे ट्रे: हे ट्रे नियमितपणे स्वच्छ करावेत.

डासरोधक वापर: मच्छरदाणी, डासरोधक मलम आणि अगरबत्तीचा वापर करावा.

पूर्ण अंग झाकणारे कपडे: विशेषतः संध्याकाळच्या वेळेस पूर्ण अंग झाकणारे कपडे परिधान करावेत.

भंगार व बांधकाम साहित्य: यांची अनावश्यक साठवणूक टाळावी.

सामूहिक जबाबदारी आणि जनजागृती:

जळगाव जिल्ह्याच्या प्रत्येक गावात, प्रत्येक वॉर्डात, प्रत्येक शाळा-महाविद्यालयात आणि प्रत्येक घरात “स्वच्छ परिसर, रोगमुक्त जीवन” हाच संकल्प असायला हवा. हे केवळ प्रशासनाचे काम नसून, आपली सामूहिक जबाबदारी आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभाग, महानगरपालिका व ग्रामीण रुग्णालये त्यांच्या पातळीवर उपाययोजना करत आहेत, त्यांना नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे.

आजपासूनच आपल्या गल्लीत, मोहल्ल्यात, शाळेत एक जनजागृती मोहीम राबवून मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी या लढ्यात सहभागी व्हावे. “स्वच्छतेच्या सवयी अंगी बाणवून, डासांवर मात करून, रोगराईपासून बचाव करूया” हे आपल्या जळगाव जिल्ह्याचे सामूहिक संकल्पवाक्य बनवून आरोग्यदायी भविष्याचा मार्ग निर्माण करूया. चला, हातात हात घालून कीटकजन्य आजारांविरुद्ध सकारात्मकतेने, सजगतेने आणि एकजुटीने लढूया!


Protected Content

Play sound