जळगाव /अमळनेर (प्रतिनिधी) जुन्या पेन्शन योजनेसाठी एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून शिक्षकांच्या पेंशनचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे-खेवलकर यांनी दिले आहे. त्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व संघटनांची बैठक जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीत आयोजित बैठकीत बोलत होत्या.
सर्व संघटनांनी एकत्र येऊन शासनाला वेठीस धरावे , शासनाला मजबूर करावे तसेच 15 जून रोजी रात्री 10 ते 12 वाजेदरम्यान आमदारांना निवेदने देणार, असा पवित्रा जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा मुख्यध्यपक संघाचे अध्यक्ष जे.के.पाटील होते. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त मात्र त्यांनतर 100 टक्के अनुदानावर आलेल्या कर्मचार्यांना शासनाने जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन अंशदायी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. न्यायालयातही शिक्षकांच्या विरोधात निकाल गेल्याने पुढील भूमिका घेण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व संघटनांची बैठक जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीत आयोजित करण्यात आली होती. व्यासपीठावर जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रोहिणी खडसे-खेवलकर , पतपेढीचे अध्यक्ष एस डी भिरुड , माजी अध्यक्ष संभाजी पाटील , एच जी इंगळे , अजय देशमुख , डॉ नानासाहेब निकम , पी डी पाटील , साधना लोखंडे , जी आर चौधरी , जयंत चौधरी , शरदकुमार बन्सी , संजय पाटील हजर होते.
यावेळी रोहिणी खडसे-खेवलकर म्हणाल्या की, न्यायालय हा शेवटचा पर्याय ठेवा मी एकनाथराव खडसेंच्या माध्यमातून येथे आले आहे. नाथाभाऊंच्या माध्यमातून शासनाकडे दाद मागू निर्णय निश्चित होईल. एस डी भिरुड यांनी भूमिका मांडताना खंत व्यक्त केली की, नवनवीन कृती समित्या तयार होतात. त्यामुळे शिक्षकांची एकी शासनाला दिसत नाही आणि शासनाला तेच पाहिजे. त्यामुळे एकसंघ राहून न्यायालयीन पातळीवर लढण्यापूर्वी शासनाशी लढू , माजी अध्यक्ष संभाजी पाटील म्हणाले की, कोणत्याही मुख्याध्यपकाने डीसीपीएसची कपात करू नये. पगार बंद झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलने करू. शिक्षक आमदारांच्या बैठकीच्या निर्णयाची वाट पाहावी लागेल. अमळनेरचे तालुकाध्यक्ष संजय पाटील म्हणाले की, आंदोलनाची तीव्रता वाढवून शासनाला जेरीस आणले पाहिजे.चाळीसगावचे संभाजी पाटील यांनी सर्व संघटना एकत्र आल्या पाहिजे असे सांगितले. बोदवडचे आर एस धनगर , चोपड्याचे मंगेश भोईटे , धरणगावचे जे के पाटील , पाचोऱ्याचे किरण पाटील , पारोळ्याचे नंदलाल पाटील , भडगावचे अनिल सोनवणे , यावल चे ए जे पाटील , दिनेश पाटील गुरव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
वेतन अधीक्षक बावर म्हणाले की, शासनाचे आदेश पाळावे लागतील. उच्च न्यायालयाचे अॅड. जितेंद्र पाटील म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात प्रकरण दाखल झाले आहे. त्यामुळे न्यायालयाला शिक्षकांची बाजू पटली आहे. जुलै महिन्यात सुनावणी होणार आहे. यावेळी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पाचशे शिक्षक उपस्थित होते. अमळनेर तालुक्यातील मंगरूळ हायस्कुलचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील, मुख्याध्यापक संघाचे एम.ए.पाटील, देवळी हायस्कुलचे मुख्याध्यापक अनिल महाजन, शिक्षक प्रभुदास पाटील, राजेंद्र पाटील, सुरेश महाजन, ईश्वर महाजन, हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष दिपक पवार, भरत पाटील, मेघराज पाटील, सोपान भवरे, लक्ष्मीकांत सैदाणे,एस.बी.ठाकरे, लिपिक,एन.जी.देशमुख, प्रविण पाटील, मुख्याध्यापक, व शिक्षक,व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.