जळगाव प्रतिनिधी | शहरात मोकाट जनावरांचा हैदोस वाढला असून त्यामुळे शहरात वाहतूक समस्या निर्माण झाली आहे. महापालिका प्रशासन मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात कमी पडत असल्याने जळगावकरांची समस्या आखणीच वाढली आहे. जनावरांमुळे वाहतूक खोळंबल्याचा प्रसंग आज सकाळी जिल्हापेठ पोलीस स्थानक ते स्वातंत्र्य चौक दरम्यान घडला.
शहरात मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम राबविली जात असल्याचा दावा महापालिकेचे अधिकारी करीत असले तरी शहरातील विविध भागातील रस्त्यांवर मात्र जनावरांचा सुळसुळाट दिसून येत आहे. आज 11.30 वाजेच्या सुमारास जिल्हापेठ पोलीस स्थानक ते स्वातंत्र्य चौक दरम्यान जवळपास 20 जनावरांचा कडप सामूहिकरीत्या रस्त्यावर उतरल्याने वाहन धारकांमध्ये चांगलीच तारांबळ उडाली होती. रस्त्यावरील पायी चालणारे व वाहन धारकांना काही जनावरे चक्क मारण्याचा प्रयत्न करत होती. दरम्यान, शहराच्या दाणा बाजार,शनिपेठ भागात मोकाट जनावरांचा त्रास अधिक आहे. त्याविषयी विशेष चर्चा होत नाही. तसेच योग्य ती कारवाई होत नसल्याने दिवसेंदिवस मोकाट जनावरांचा त्रास वाढत आहे. अशा मोकाट सुटलेल्या जनावरांना ताब्यात घेऊन गोशाळेत देण्याची मागणी वाहनधारक आणि नागरिक यांच्याकडून होत आहे.