कुवेत आग दूघर्टनेतील मृतांच्या कुटुंबियाना पंतप्रधानाकडून २ लाखाची मदत जाहीर

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कुवेतच्या मंगफ भागात आज सकाळी भीषण आग लागून 49 मजुरांचा मृत्यू झाला. या अपघातामध्ये 50 हून अधिक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश भारतीय नागरिकांचा समावेश आहे. सहा मजली इमारतीच्या स्वयंपाकघरात सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. या इमारतीत 196 कर्मचारी राहत होते, त्यापैकी बहुतेक प्रवासी कामगार होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आग झपाट्याने पसरली आणि तिने इमारतीला पूर्णपणे वेढले. अरब टाइम्सच्या वृत्तानुसार, प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, आग लागली तेव्हा बहुतांश कामगार झोपले होते. आग लागल्याचे समजताच त्यांनी जीव वाचवण्यासाठी धावण्याचा प्रयत्न केला, मात्र धूर आणि आगीत अनेक लोक अडकले.

कुवेती अग्निशमन विभाग आणि बचाव पथकाने तातडीने घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. अनेक तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील 7 लोककल्याण मार्ग येथील त्यांच्या निवासस्थानी कुवेतमधील आगीच्या दुर्घटनेबाबत आढावा बैठक घेतली. या अपघातात 40 हून अधिक भारतीयांचा मृत्यू झाला आहे. अनेक भाजलेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पंतप्रधानांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आणि मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. भारतीयांना शक्य ती सर्व मदत करण्यात यावी, अशा सूचना मोदींनी जारी केल्या आहेत. पंतप्रधानांनी परराष्ट्र राज्यमंत्र्यांना ताबडतोब कुवेतला जाऊन मदत उपायांवर लक्ष ठेवण्याचे आणि मृतदेह ताबडतोब परत आणण्याचे आदेश दिले आहेत.

पंतप्रधान सहाय्यता निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची एक्स-ग्रॅशिया रक्कम जाहीर करण्यात आली आहे. कुवेतमधील भारतीय दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि बाधितांना मदत करण्यासाठी तेथील अधिकाऱ्यांसोबत काम करत आहे. कुवेतमधील भारतीय दूतावासाने +965-65505246 हा हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. आग आटोक्यात आणली गेली असून, त्याच्या कारणाचा शोध घेतला जात आहे.

Protected Content