इस्लामाबाद (वृत्तसंस्था) पुलवामा हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव वाढल्याने पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी ४४ दहशतवाद्यांवर कारवाई केली आहे. तसेच आधी पाकिस्तानची भूमी दहशतवादासाठी वापरली गेली असेल, पण यापुढे ती वापरू देणार नाही, असे वक्तव्य इम्रान खान यांनी केले आहे.
शुक्रवारी इम्रान खान यांनी दहशतवादी संघटनांना हा इशारा दिला. गेल्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये खान पंतप्रधान झाले होते. त्यांनी यापूर्वीच्या सरकारांवर दहशतवाद पोसल्याचा आरोप केला आहे.
मागील सरकारांनी या संघटनांवर कोणतीही कारवाई न केल्याने दहशतवाद फोफावला आहे. तहरीक ए इन्साफ पक्षाच्या सरकारने सत्तेत आल्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंध सुधारण्यासाठी कडक पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. यानुसार दहशतवादाशी संघर्ष केला जात आहे. सिंधमधील थारपारकर जिल्ह्यातील एका सभेवेळी इम्रान यांनी हे वक्तव्य केले आहे.
सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये जबरदस्त तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा शांततेचा राग आळवला आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोघेही सशस्त्र देश आहेत, युद्धामुळे कुणाचेही भले होणार नाही. त्यामुळे आपल्याला चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवावे लागतील, आम्ही चर्चेस तयार आहोत, असा दावा इम्रान खान यांनी काल केला होता. ”भारताने केलेल्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून आम्ही कारवाई केली आहे. मात्र युद्ध हे कुठल्याही गोष्टीचा पर्याय ठरू शकत नाही. भारत आणि पाकिस्तान दोघेही शस्त्रसज्ज देश आहेत. त्यामुळे युद्ध झाल्यास गंभीर परिणाम होतील. त्यामुळे दोन्ही देशांना युद्ध परवडणार नाही.” असा दावा त्यांनी केला होता.