एरंडोल येथील महाविद्यालयात पोस्टर सादरीकरण स्पर्धा उत्साहात

poster

एरंडोल प्रतिनिधी । येथील डी. एस. पाटील महाविद्यालयात आज दि. 20 सप्टेंबर रोजी मानसिक स्वास्थ्य, मानसिक आजार व त्यावरील उपचार या विषयावर पोस्टर सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, शैक्षणिक संस्थांनी केवळ पारंपरिक शिक्षणक्रमास प्राधान्य न देता समाजाभिमूख उपक्रमान राबवावे. ज्यात सुदृढ मानसिक आरोग्य आणि मूल्यनिष्ठ समाजनिर्मितीसाठी जाणीपूर्वक प्रयत्न केले जावेत, हेच नवीन शैक्षणिक धोरणात अपेक्षीत असल्याचे मत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.डॉ.पी.पी. माहुलीकर यांनी मांडले. विद्यार्थ्यांशी हितगुज करतांना ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यही महत्त्वाचे आहे. त्यामुळे नविन शैक्षणिक धोरणात मानसिक आरोग्यावर अधिक भर दिला पाहिजे. त्यासाठी विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयात अशा प्रकारचे उपक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित केले जावेत आणि या उपक्रमांसाठी विद्यापीठाकडून योग्य ते सहकार्य केले जाईल.

याप्रसंगी मानसिक आरोग्यावर सहभागी विद्यार्थ्यांचे पोस्टर इंद्रधनुष्य, युवारंग, साहित्य संमेलन आणि इतर कार्यक्रमात ठिक-ठिकाणी लावण्यात येतील, जेणेकरुन विद्यार्थ्यांना व नागरीकांनाही या विषयाची जाणीव जागृती होईल असे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डी.आर. पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अतिथी व संस्थेचे उपाध्यक्ष आनंदराव पाटील यांनी आपल्या भाषणातून मानसिक आरोग्य कसे चांगले ठेवावे व त्याला अध्यात्माची जोड कशी देता येईल ते सांगितले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.आर.पाटील, संस्थेचे अध्यक्ष अमित पाटील यांनी मार्गदर्शन केले.

प्रत्येक महाविद्यालयात समुपदेशन केंद्र स्थापन करुन विद्यार्थ्यांबरोबर समाजातील अन्य घटकांच्याही मानसिक अडचणी सोडविल्या जाव्यात. मानसिक आरोग्यावर आधारित एका नव्या व अभिनव उपक्रमाची सुरुवात एरंडोल महाविद्यालयाने केली म्हणून त्यांनी विशेष प्राचार्य आणि संस्थेचे अभिनंदन केले. मानसिक आरोग्यावर आधारित या पोस्टर स्पर्धेत कबचौउम विद्यापीठ, जळगाव परिक्षेत्रातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्हयांतील 22 महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला. या महाविद्यालयांमधून पदवीगटातून- 40 आणि पदव्युत्तर गटातून व 19 असे 59 पोस्टर्स लावण्यात आले होते.

स्पर्धेचे उद्घाटन जळगाव येथील कबचौ उमवि, प्रा-कुलगुरु प्रा.डॉ.माहुलीकर यांचेहस्ते फित कापून करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अमीत पाटील होते. तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा.डी.आर.पाटील, माधवराव पाटील आणि आनंदराव पाटील हे होते. व्यासपीठावर डॉ. शरद पाटील, जगदिश पाटील, प्रा.एस.पी.पाटील, प्रा.एस.एम.पवार, प्रा.डॉ.सी.पी.लभाणे, सुप्रसिध्द मनोचिकित्स डॉ.प्रदिप जोशी, सुप्रसिध्द समाजसेवक व आशा फाऊंडेशन, जळगावाचे प्रमुख गिरीष कुळकर्णी व मानसशास्त्रज्ञ वीना महाजन, मानसशास्त्र अभ्यासमंडळाचे अध्यक्ष गोकुळ चौधरी, समन्वयक व उपप्राचार्य डॉ. अरविंद बडगुजर हे होते. दुपारच्या सत्रात परिक्षणानंतर परिक्षकांनी स्पर्धेचा निकाल जाहिर केला व नंतर विजेत्या स्पर्धकांना एरंडोल शहराचे नगराध्यक्ष रमेश परदेशी तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

सदर प्रदर्शनाचा लाभ एरंडोल शहरातील नागरिक, शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, गावातील बहुसंख्य नागरिक यांनी प्रदर्शनाचा लाभ घेतला. सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक मानसशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ. रेखा साळुंखे यांनी केले. नंतर प्रा.डॉ.राम वानखेडे आणि प्रा.स्वाती शेलार यांनी केले तर आभार प्रा.सी.वाय. पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले.

Protected Content