Home राजकीय राज-उद्धव ठाकरे युतीची शक्यता वाढली; जागावाटपावर शिक्कामोर्तब होणार !

राज-उद्धव ठाकरे युतीची शक्यता वाढली; जागावाटपावर शिक्कामोर्तब होणार !


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्यात युती होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विशेष म्हणजे दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनीही या संदर्भात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत. आता ही युती प्रत्यक्षात आकार घेत असल्याचे दिसत आहे.

राजकीय जाणकारांनुसार, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकत्र आल्यास आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल घडू शकतात. विशेषतः मुंबई महानगरपालिका तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी हे दोन्ही नेते एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच शक्यतेमुळे विरोधी बाकावरील महायुतीच्या घटक पक्षांनीही आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

दोन्ही ठाकरे बंधूंनी आपापल्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. उद्धव ठाकरे यांनी नुकतेच म्हटले होते की, “युतीचं काय करायचं ते आम्ही बघू. हा निर्णय आमच्यावर सोडा. तुम्ही निवडणुकीच्या तयारीला लागा.” याचप्रमाणे राज ठाकरे यांनीही आपल्या कार्यकर्त्यांना, “ठाकरे गटासोबतच्या युतीचा निर्णय माझ्यावर सोडा. मी योग्य भूमिका घेऊन ती जाहीर करेन,” असे सांगितले होते. त्यामुळे आता ही युती कधी अधिकृतपणे जाहीर होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, लवकरच होणाऱ्या मुंबईतील बेस्ट कामगार मतपेढीच्या निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांनी युती केल्याचे बोलले जात आहे. ‘उत्कर्ष पॅनल’च्या माध्यमातून मनसे आणि ठाकरे गट एकत्र येणार असून, त्यांच्यात जागावाटपही ठरल्याची चर्चा आहे. आज ७ ऑगस्ट या जागावाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या निवडणुकीतील एकूण २१ जागांपैकी १९ जागांवर उद्धव ठाकरेंची कामगार सेना निवडणूक लढवण्याची शक्यता आहे, तर उर्वरित २ जागा मनसेच्या बेस्ट कामगार संघटनेला मिळतील असे सांगितले जात आहे.


Protected Content

Play sound