यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल आगारातील जीर्ण झालेली बसस्थानकाची इमारत आणि प्रवाहतुकीसाठी उपलब्ध असलेल्या भंगार एस.टी. बसेस यामुळे यावलकरांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. एसटी महामंडळ आणि लोकप्रतिनिधी या गंभीर प्रश्नाकडे कधी लक्ष देणार, अशी विचारणा प्रवासी करत आहेत.

जिल्ह्यातील बहुतांश बसस्थानकांच्या इमारतींचे नूतनीकरण मागील पाच वर्षांत पूर्ण झाले असताना, तीन लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या आदिवासी क्षेत्राच्या मध्यभागी असलेले यावल बसस्थानक मात्र या नूतनीकरणातून वगळले गेले आहे. जुनाट आणि जीर्ण झालेल्या इमारतीचे त्वरित नूतनीकरण व्हावे यासाठी विविध सामाजिक संस्थांनी मागणी करूनही हा प्रश्न आजही प्रलंबित आहे.

यावल आगारात प्रवासी वाहतूक करणाऱ्या जवळपास सर्वच एस.टी. बसेस अतिशय नादुरुस्त आणि भंगार झालेल्या अवस्थेत आहेत. प्रवाशांना जीव मुठीत घेऊन या गाड्यांमधून प्रवास करावा लागत आहे. लांब पल्ल्याच्या मार्गावर या बसेसमध्ये बिघाड होणे, वारंवार ब्रेक निकामी होणे असे प्रकार वारंवार घडत असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. सुदैवाने अजून कोणताही मोठा अपघात झाला नसला तरी, अशा भंगार बसेसमुळे भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त होत आहे.
बसगाड्यांची बिकट अवस्था असूनही यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक हे अशा परिस्थितीत देखील महामंडळाच्या उत्पन्न वाढीसाठी तारेवरची कसरत करत परिश्रम घेत आहेत. लोकप्रतिनिधींनी आणि एसटी महामंडळाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन यावल आगारास गरजेनुसार नवीन बसगाड्या उपलब्ध करून द्याव्यात, तसेच बसस्थानकाच्या इमारतीचे नूतनीकरण तात्काळ करावे, अशी तीव्र मागणी प्रवासी नागरिक करत आहेत.



