जळगाव प्रतिनिधी । जखमीला जिल्हा रुग्णालयात आणले असता तपासणीस तेथील डॉक्टरांनी विलंब लावल्याने विचारणा करणाऱ्या तरुणाला जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने संदीप बापू पाटील रा. हरिविठ्ठलनगर हा तरुण जखमी अाहे.
प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार, रामानंदनगर पोलिसांनी मेमो दिल्यानंतर संदीप पाटील हा तरुण जखमीला घेऊन जिल्ह्यात रुग्णालयात आला. या ठिकाणी बराच वेळ उलटूनही जखमीस कुठलेही उपचार होत नसल्याने संदीप पाटील याने डॉक्टरांना जाब विचारला. त्याचा राग आल्याने जिल्हा रुग्णालयातील दोन डॉक्टरांसह सुरक्षारक्षाकांनी संदीप पाटील बेदम मारहाण केली. या घटनेत संदीप यास डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. संबंधित डॉक्टरला त्याचे नाव विचारले असता त्याने माझं नाव अधिष्ठात्यांना विचारा असे मुजोरपणे उत्तर दिल्याचेही यावेळी समोर आले आहे.
तर ही मारहाण डॉक्टरांनी केली नसून उलटपक्षी जखमी झालेल्यांनीच डॉक्टरांना मारल्याचे प्रशासनाने म्हणणे आहे. काल रात्री जामनेर तालुक्यातील अपघातात मृत झालेल्यांपे पार्थिव तसेच जखमी झालेल्यांना जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले होते. यातच हरविठ्ठल नगरातील जखमींनाही सिव्हील आणण्यात आले. एकाच वेळेस झालेल्या या गर्दीत काही जणांनी तेथील डॉक्टरांना मारहाण केली. याला दोन्ही डॉक्टरांनीही प्रत्युत्तर दिल्याने गोंधळ उडाली. या प्रकरणी जखमी तरूण आणि डॉक्टर यांनी पोलीसात तक्रार देण्याची तयारी केली असून रात्री उशीरापर्यंत मात्र याची जिल्हापेठ पोलीस स्थानकात नोंद झाली नव्हती.