यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील खेळाडू आणि युवकांची अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर आहे. नगरपरिषदेच्या नियोजित क्रीडांगणाच्या जागेचे शुक्रवारी भूमिअभिलेख विभागाकडून अधिकृत मोजमाप करण्यात आल्याने क्रीडांगण विकासाच्या कामाला लवकरच गती मिळणार आहे. मोजणी शीट प्राप्त झाल्यानंतर संबंधित जागा नगरपरिषदेच्या ताब्यात येणार असून त्यानंतर विकासकामांना वेग दिला जाणार आहे.
यावल शहरात स्वतंत्र आणि सुसज्ज क्रीडांगणाची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. खेळाडूंना सरावासाठी योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने युवकांमध्ये नाराजी होती. ही बाब लक्षात घेऊन नगराध्यक्ष छायाताई पाटील यांनी क्रीडांगणाचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता मोजमाप प्रक्रिया सुरू झाल्याने शहरातील खेळाडूंमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सातोद रस्त्यावरील शेत गट क्रमांक ३७, सिटी सर्वे क्रमांक ३८३५ मधील ०.५१ आर जागा क्रीडांगणासाठी आरक्षित करण्यात आली होती. संबंधित शेतमालकाला जागेचा मोबदला देण्यात आला असला तरी जागा अद्याप नगरपरिषदेच्या ताब्यात आली नव्हती. नगरपरिषदेकडून आवश्यक शुल्क भरल्यानंतर भूमिअभिलेख विभागाने प्रत्यक्ष मोजमाप प्रक्रिया सुरू केली आहे.
या वेळी नगराध्यक्ष छायाताई पाटील, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील, शिक्षण समिती सभापती पराग सराफ, नगरसेवक निसार मोमीन, उमर कच्छी, काँग्रेस शहराध्यक्ष हाजी हकीम शेख, मजहर शेख तसेच शिवसेना उबाठा गटनेते सागर चौधरी आदी उपस्थित होते.
दरम्यान, नगरपरिषदेच्या वतीने क्रीडांगणाच्या जागेची स्वच्छता मोहीमही हाती घेण्यात आली आहे. जेसीबीच्या सहाय्याने परिसर समतल करण्याचे काम सुरू असून मोजमाप पूर्ण झाल्यानंतर खुणा गाडून जागा अधिकृतपणे नगरपरिषदेच्या ताब्यात दिली जाणार आहे. त्यानंतर शहरातील खेळाडूंना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी क्रीडांगण विकासाचे काम हाती घेतले जाणार असल्याची माहिती नगराध्यक्षांनी दिली.



