Home Cities जळगाव श्री स्वामी समर्थच्या जयघोषात पालखी सोहळा त्र्यंबकेश्वरकडे रवाना !

श्री स्वामी समर्थच्या जयघोषात पालखी सोहळा त्र्यंबकेश्वरकडे रवाना !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प.पु. गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आणि युवा संत आदरणीय चंद्रकांत दादांच्या मार्गदर्शनाखाली, श्री स्वामी समर्थ केंद्र जानकी नगरतर्फे आयोजित जळगाव ते त्र्यंबकेश्वर पायी पालखी सोहळ्याचे यंदा १० व्या वर्षात मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले. सोमवारी ९ मार्च रोजी सकाळी ८ वाजता ‘श्री स्वामी समर्थ’ नामाच्या जयघोषात आणि सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून हा सोहळा मार्गस्थ झाला.

भक्तीसोबतच जपला पर्यावरण रक्षणाचा वसा :
यंदाच्या १० व्या वर्षाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या सोहळ्याने केवळ आध्यात्मिकच नव्हे, तर सामाजिक आणि पर्यावरणीय जबाबदारी देखील स्वीकारली आहे. प्रवासादरम्यान ठिकठिकाणी पक्षांसाठी मातीची भांडी (परळ) वाटप करण्याचा उपक्रम डॉ. लीना पाटील यांच्या माध्यमातून राबवला जात आहे. यासोबतच मार्गातील नद्यांची स्वच्छता करणे, वृक्षारोपण करणे आणि शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून देणे, असे बहुआयामी उपक्रम या पालखी सोहळ्याचा भाग असणार आहेत.

मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साही स्वागत :
पालखीचे प्रस्थान जळगाव जिल्हा प्रमुख विजय निकम काका आणि एन. डी. बोरसे सर यांच्या हस्ते करण्यात आले. पालखी मार्गस्थ झाल्यावर जुने जळगाव, रथ चौक आणि शाहूनगर मार्गे प्रताप नगर केंद्रात दाखल झाली. येथे सकाळी १०:३० वाजता महापौर दीपमाला काळे आणि माजी महापौर सीमा भोळे यांच्या हस्ते आरती करण्यात आली.

सेवेकऱ्यांचे नियोजन आणि पाहुणचार :
दुपारच्या सत्रात मानराज पार्क येथे श्री. रवींद्र त्र्यंबक माळी यांच्या निवासस्थानी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी ३:०० वाजता जैन इरिगेशनतर्फे वारकरी व सेवेकऱ्यांसाठी चहा-पाण्याची व्यवस्था करण्यात आली. संध्याकाळी ६:०० वाजता पाळधी येथील केंद्रात आमदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आरती संपन्न होणार आहे. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुके आणि १८ विभागांमधील शेकडो सेवेकरी अथक परिश्रम घेत आहेत. भक्ती आणि पर्यावरणाचा हा सुंदर मेळ संपूर्ण मार्गावर आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.


Protected Content

Play sound