नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिदीच्या जमीन वादाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात बुधवारी पूर्ण झाली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई हे १७ नोव्हेंबपर्यंत या खटल्याचा निकाल देण्याची शक्यता आहे. दरम्यान, तत्पूर्वी हिंदू व मुस्लीम समाजातील धार्मिक नेते व संघटनांकडून निकाल काहीही लागो. परंतू लोकांनी शांतता राखवी, असे आवाहन केले आहे.
आज उत्तर प्रदेशमधील मुस्लिम धर्मगुरूंनी शुक्रवारच्या नमाजच्या अगोदर मशिदींमध्ये निकालाच्या पार्श्वभूमीवर शांततेचे आवाहन केले. लखनऊमध्ये शाही इमाम खालिद रशीद फिरंगी महाली यांच्या नेतृत्वात हे आवाहन करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयचा जो काही निकाल असेल त्याचा आदर असला पाहिजे. त्या ठिकाणी जल्लोष किंवा नागरिकांकडून विरोध होऊ नये. एखाद्या समाजाच्या भावना दुखावतील अशी वक्तव्य देखील व्हायला नको. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत शांतता कायम राखणे आवश्यक आहे, असेही रशीद यांनी म्हटले. दरम्यान, या अगोदर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून निकालाच्या पार्श्वभूमीवर, निकाल काही असो प्रत्येकाने तो खुल्या मनाने स्वीकारायला हवा. निकालानंतर देशाचे वातावरण सौहार्दपूर्ण राहिले पाहिजे ही सर्वांची जबाबदारी आहे, असे सांगण्यात आले होते.